: ग्रामविकास अधिकारी नसल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी :
गारगोटी ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून पगार व पीएफची रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा गुरुवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन कर्मचाऱ्यांनी भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना दिले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रा.पं. असलेल्या गारगोटीमध्ये गेले कित्येक महिने पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. येथे साठ कामगार काम करत असून, गेल्या अठरा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा लाखो रुपयांचा प्राॅव्हिडंट फंड (भविष्य निर्वाह निधी) भरला गेला नाही. याशिवाय गेल्या दोन महिन्यांपासून पगारही झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत असून, उपजीविकेसाठी बँकेकडून घेतलेली कर्जे, हातउसने घेतलेले पैसे कसे परत करायचे याची विवंचना कर्मचाऱ्यांना लागली आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर होऊ लागला आहे. त्यांना पगार त्वरित द्यावा, प्राॅव्हिडंट फंडाची रक्कम त्वरित जमा करावी या मागणीच निवेदन गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांना देण्यास कर्मचारी गेले असता पवार यांनी कर्मचाऱ्यांना तोंडाला मास्क लावून आत, या अशा सक्त सूचना देऊन त्या कर्मचाऱ्यांवर चांगल्याच डाफरल्या. कर्मचारी निवेदन देण्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेले असता उपदेशाचे डोस देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्याच तोंडाला मास्क नसल्यामुळे कर्मचारी अवाक् झाले. त्यांच्या संतापजनक प्रतिक्रियेमुळे कर्मचारी चांगलेच नाराज झाले. कर्मचाऱ्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी थेट तहसीलदारांकडे धाव घेतली. तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तोडगा काढण्यासंदर्भात सूचना केली. यावेळी तानाजी साळवी, अशोक शिंदे, रमेश आबिटकर, सुरेश देसाई, ओमकार कौलवकर, शैलेश सावंत, पांडुरंग गोरे, निर्मला कांबळे, आनंदी गुरव आदींसह कर्मचारी उपस्थित होते.