लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : पशुधनाच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाचे पशुवैद्यच पशुपालकांच्या दारात येणार आहेत. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, कागल, करवीर या पाच तालुक्यांत प्राथमिक टप्प्यात फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत गावागावात जाऊन मागणीनुसार या तपासणीचे काम करण्यास गतिमानता येणार आहे.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्य शासनाने हा उपक्रम राबविण्याचे जाहीर करून जानेवारी अखेरीस त्याचा प्रारंभ केला. त्यानुसार राज्यात ८१ तालुक्यांची निवड करून फिरती पशुचिकित्सालये स्थापन केली. कोल्हापूर जिल्ह्यात या पथकासाठी आरोग्य सेवा सुविधा असलेली पाच वाहने उपलब्ध झाली आहेत.
गंभीर आजारी असल्याने दवाखान्यात नेता येत नाहीत तसेच आजारपणामुळे हालचाल करता येत त्यामुळे जाग्यावरच बसून असलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठीच्या दृष्टीने ही योजना अधिक उपयोगी आहे.
ग्रामीण भागात अनेक गावात, वाड्यावस्त्यांवर पाशीवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी पशुपालकांना प्रचंड कसरत करावी लागते. गावात किंवा जवळपास दवाखाना नसल्याने गंभीर आजार असलेल्या जनावरांचा उपचार न झाल्याने मृत्यू झाल्याचे चित्र पहावयास मिळते.
आता मात्र कुठेही कधीही जाऊन सरकारी पशुवैद्य या फिरत्या पशुचिकित्सा वाहनातून जाऊन उपचार करणार आहेत. त्यामुके उपचाराअभावी जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.
आजारी जनावरांची माहिती देण्यासाठी ‘१९६२’ हा टोल नंबर देण्यात येणार आहे. हा नंबर डायल करून आजारी जनावरांची कल्पना दिल्यानंतर पशुचिकित्सा वाहन (ॲम्बुलन्स) तत्काळ उपचार करण्यासाठी हजर राहील. यामध्ये एक डॉक्टर, एक सहाय्यक असेल.
विशेष म्हणजे हे वाहन अनेक सुविधानी युक्त असे आहे. यामध्ये मिनी ऑपरेशन थिएटर, बसलेल्या जनावरांना उभे करण्यासाठी चेनपुली, दोन फ्रीज, छोटी लॅबोरिटी, मायक्रोस्कोप, ऑपरेशन साहित्य यांची उपलब्धता आहे. तसेच गावागावात जनावरांच्या संदर्भात तसेच पशुखाद्य याची माहिती देण्यासाठी एलसीडी बसविलेला आहे. चर्चासत्रेही घेण्यासाठी साऊंड सिस्टीमची सोय आहे. सर्व प्रकारच्या पशुधनावर उपचार करण्याची व्यवस्था याद्वारे पार पाडता येणार आहे. कसलाही आजार असेल, शारीरिक इजा झाली असेल तर आता तत्काळ उपचार होणे सोपे जाईल.
कोटं
सुरुवातीच्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेश झाला आहे. यानंतर उर्वरित तालुक्यांसाठीही ही योजना राबविली जाणार आहे. अतिजलद उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग नेहमीच सतर्क राहील. अत्यंत महत्वपूर्ण अधिक उपयोगी अशी ही योजना आहे. ती जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविली जाईल.
- डॉ. वाय. ए. पठाण
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त