(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : आर्थिक दृष्टचक्रात अडकत चाललेल्या यंत्रमाग व्यवसायाला सावरण्यासाठी शासनाने मदत देणे गरजेचे आहे. या प्रश्नाकडे राजकारण म्हणून न पाहता उद्योग म्हणून पाहावे. याबाबत १५ जानेवारी २०२१ पर्यंत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आपल्या हक्कासाठी संघर्ष अटळ आहे, असा इशारा देत त्यासाठी कारखानदारांनी एकजुटीने पाठबळ द्यावे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
वस्त्रोद्योगातील बिकट बनत चाललेल्या परिस्थितीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात शहरातील यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आमदार आवाडे यांनी बोलवली होती.
सुरुवातीला आत्महत्या केलेल्या यंत्रमागधारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आवाडे पुढे म्हणाले, २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना ७५ पैशांची आणि साध्या यंत्रमागाला १ रुपयाची अतिरिक्त सवलत देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी एकत्र व्हावी, यासाठी मी प्रयत्न केला. परंतु त्यातून काहीजणांनी गैरसमज करून घेतला. दोन्ही मिळून साधारण १२ कोटी रुपये लागणार आहेत, ते शासनाला शक्य आहे. असे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करताना परिणामाची तमा न बाळगता लढावे लागेल. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला भक्कमपणे पाठबळ द्या. प्रश्नांची सोडवणूक कशी करायची ते मी पाहतो. पाच टक्के व्याजाच्या सवलतीसाठी केंद्र व राज्य शासन या दोघांकडे मागणी करूया. तसेच सूत खरेदी करताना यंत्रमागधारकांनी सजग राहावे. खात्री न करता खरेदी करू नये, असेही स्पष्ट केले.
यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सागर चाळके, सुनील पाटील, सतीश कोष्टी, विनय महाजन, विकास चौगुले, बंडोपंत लाड, पांडुरंग धोंडपुडे, नारायण दुरूगडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये सूत दराचा प्रश्न भेडसावत असून, त्यासाठी सूत व्यापारी, अडते, ट्रेडिंगधारक, सायझिंगधारक यांची व्यापक बैठक घ्यावी, यासाठी आवाडे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
(फोटो ओळी)
२८१२२०२०-आयसीएच-०९
इचलकरंजीत यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सतीश कोष्टी, अशोक स्वामी, सागर चाळके उपस्थित होते.
(छाया - उत्तम पाटील)