आजरा : आजरा शहरात आजपासून सुरू केलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रतिसाद मिळाला. रुग्णालये व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद होते. आजरा नगरपंचायतीने ११ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे. पोलिसांनी संभाजी चौकात बॅरिकेटस् लावून बाजारपेठेतील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय आजरा नगरपंचायतीने घेतला आहे.
आजरा शहरातील रुग्णालये व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. बाहेर गावच्या लोकांना आजऱ्यात येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक गावेही कोरोना हॉटस्पॉट झाल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. आज दिवसभर आजरा बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. गोकुळच्या निवडणूक निकालावरही जनता कर्फ्यूमुळे परिणाम झालेला दिसत होता.
जनता कर्फ्यूमुळे नाशवंत भाजीपाल्याची काही व्यापाऱ्यांनी गल्ल्लोगल्ली फिरून विक्री केली. अचानक लावलेल्या जनता कर्फ्यूमुळे नागरिकांना घरगुती वस्तू मिळणे अडचणीचे झाले आहे.
-------------------------
फोटो ओळी : आजरा शहरातील संभाजी चौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बाजारपेठेतील बंद केलेला रस्ता.
क्रमांक : ०४०५२०२१-गड-०४