कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २९९० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी २९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. उर्वरित जणांना बाधा झालेली नाही. दरम्यान, गणेशोत्सवामुळे कोरोनाची तपासणी मंदावली आहे. यामुळेही कोरोना रुग्णसंख्येचा आकडा कमी झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बाधित आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. बाधितांची संख्या कमी येण्यास कोरोनाची चाचणी कमी होणे हेही कारण असू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ज्या दिवशी रोज दहा हजारांपेक्षा अधिक चाचण्या होतात, त्या दिवशी बाधितांची संख्याही वाढते. पाच हजारांपेक्षा कमी चाचण्या होतात, त्यावेळी बाधितांची संख्याही कमी होते. चोवीस तासांत झालेल्या तपासणीत ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय १०१७ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मृत झालेल्या दोघांनाही दीर्घ आजार होते, असा आरोग्य प्रशासनाचा दावा आहे. रुग्णसंख्या कमी झाली तरी नागरिकांनी बेसावध राहू नये. मास्क घालूनच वावरावे, गर्दी करू नये, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.