बाबासाहेब नेर्ले -गांधीनगर -या ना त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या गांधीनगर वसाहत रुग्णालयाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. करवीर पूर्व भागातील लोकांसाठी मोठा आधारवड म्हणून गांधीनगर वसाहत रुग्णालयाकडे पाहिले जाते. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सध्याची स्थिती ही रुग्णांसाठी वरदान ठरणारी असून, गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होत आहे. गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, निगडेवाडी, गडमुडशिंगी, न्यू वाडदे वसाहत या गावांतील रुग्णांसाठी या वसाहत रुग्णालयाचा आश्रय घ्यावा लागतो. गेल्या दहा वर्षांमध्ये या रुग्णालयाने चार वैद्यकीय अधीक्षक पाहिले. २००४ या कालावधीत डॉ. ए. व्ही. पाटील यांच्यानंतर २००८ मध्ये डॉ. व्ही. एस. पाटील, त्यानंतर प्रभारी म्हणून डॉ. ए. जी. जमादार यांनी काम पाहिले; पण या काळात काही सामाजिक संघटनांनी रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविषयी आंदोलने केली. मात्र, या रुग्णालयाला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत.सध्या या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी १ आॅगस्ट १३ पासून पदभार सांभाळला आहे. त्यांच्या संकल्पनेतून गांधीनगर वसाहत रुग्णालयाचा कायापालट झाला आहे. त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी अनेक सुविधा चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. तसेच सेवाही गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे. मिळणाऱ्या सेवेतून रुग्णांचे समाधान झाले पाहिजे. रुग्णालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर रुग्णांमधील शासकीय दवाखान्याविषयीची प्रतिमा बदलेल. ५० खाटांची व्यवस्था असणाऱ्या या रुग्णालयात महिला प्रसूती विभाग, क्षयरोग निदान, कान-नाक-घसा याविषयी होमिओपॅथिक उपचार, प्रसूती महिलांना मोफत जेवण, दारिद्र्यरेषेखालील असल्यास अनुदान, अशा अनेक प्रकारच्या सुविधा या रुग्णालयात मिळत आहेत. तसेच येथील रुग्णालयाच्या इमारतीचे रंगकाम हे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वर्गणीतून केले आहे. स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे या रुग्णालयाचा कायापालट झाला आहे.गांधीनगर वसाहत रुग्णालयाची सद्य:स्थिती ही रुग्णांच्यादृष्टीने चांगली झाली आहे. प्रत्येक रुग्णाचे चांगल्याप्रकारे निदान करून औषधोपचार केले जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.- अशोक देवकुळे, माजी आरोग्य सभापती, गांधीनगर ग्रामपंचायतगांधीनगर वसाहत रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने लहान मुलांना इतर रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांना याचा त्रास होत असून, येथे बालरोगतज्ज्ञांची भरती होणे गरजेचे आहे.या रुग्णालयात अजूनही काही उपकरणांची गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी केले आहे.
गांधीनगर वसाहत रुग्णालयाला आले ‘अच्छे दिन’
By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST