कोल्हापूर : जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ (गोकुळ)च्या निवडणुकीचा बार फेबु्रवारीत उडणार असून, सहा साखर कारखान्यांचा कार्यक्रमही सुरू केला जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी दिली. जास्तीत जास्त मतदारांना या प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी जिल्हास्तरीय संस्थांच्या निवडणुकीची मतदान केंद्रे ेप्रत्येक तालुक्यांत ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणूक कामकाजाचा आढावा आज, चौधरी यांनी घेतला. त्यानंतर ते बोलत होते. गोकुळ दूध संघाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून, १५ डिसेंबर २०१४ ही ‘कट आॅफ डेड’ दिली आहे. तत्पूर्वी तीन वर्षे कार्यरत असणाऱ्या संस्था मतदानास पात्र ठरणार आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्हा बँकेवर प्रशासक असल्याने या संस्थांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. निवडणुकीबाबत रिझर्व्ह बॅँकेला कळविले आहे. जून २०१५ पर्यंत राज्यस्तरीय संस्थांसह सर्वच संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने एप्रिलमध्ये राज्य बँकेची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा बँक व ‘गोकुळ’ या संस्थांच्या निवडणुका घेणे गरजेचे असून, साधारणत: फेबु्रवारी महिन्यात या दोन्ही संस्थांची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही मधुकर चौधरी यांनी सांगितले. ‘गोकुळ’चा निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यांची मतदारयादी आठवड्यात तयार करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांना दिले असून, कारखान्यांसाठी उपजिल्हाधिकारी अथवा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक सदानंद जाधव, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम, शहर उपनिबंधक रंजन लाखे, करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे उपस्थित होते. ‘गोकुळ’, ‘वारणा’चे कर्मचारी वापरा दूध व विकास संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्मचारी कमी पडत असले तर ‘गोकुळ’ व ‘वारणा’ दूध संघाचे कर्मचारी घ्यावेत, तसा प्रस्ताव करून दोन दिवसांत पाठविण्याच्या सूचना चौधरी यांनी दिल्या. त्याचबरोबर पंचायत समिती, महसूलमधील कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यास त्यांनी सांगितले. वर्गीकरण नाही घटना दुरुस्तीत क्रियाशील, अक्रियाशील असे वर्गीकरण असले तरी आताच्या निवडणुकीत याचे बंधन राहणार नाही. पण, थकबाकीदारांचा मतदारयादीत समावेश होणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले. प्रदीप मालगांवेचे कौतुक मधुकर चौधरी यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांचा तालुकानिहाय आढावा घेतला. त्यामध्ये करवीरचे साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी सर्वांत चांगले काम केल्याबद्दल चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले. ‘गोकुळ’ची यादी अद्ययावत करणार दोन वर्षांपूर्वी ‘गोकुळ’ची मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. आता काही दूध संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने यादीबाबत संभ्रमावस्था आहे. याबाबत विचारणा केली असता, ‘गोकुळ’शी संलग्न सुमारे सहाशे दूध संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यांच्या पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत मतदारयादी तयार करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ निवडणुकीचा बार फेबु्रवारीत
By admin | Updated: December 21, 2014 00:11 IST