लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) व्यवस्थापकीय संचालक पदासाठी शुक्रवारी सातजणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, आज, शनिवारी दहाजणांना बोलवले आहे. व्यवस्थापकीय संचालकांसह मार्केटिंग व्यवस्थापक पदांवरील नियुक्तीवर उद्या, रविवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक डी. व्ही. घाणेकर हे दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. तत्कालीन संचालक मंडळाने त्यांना दोन वर्षे मुदतवाढ दिली होती. मात्र ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर घाणेकर यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातून एक महिन्यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक व मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. व्यवस्थापकीय संचालक पदासाठी २२, तर मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठी १० जणांचे अर्ज आले आहेत. मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठी गुरुवारी मुलाखती घेण्यात आल्या. शुक्रवारी व्यवस्थापकीय संचालक पदासाठी १२ इच्छुकांना बोलवण्यात आले होते. त्यातील सातजणच इच्छुक मुलाखतीसाठी आले होते. आज, शनिवारी उर्वरित दहाजणांना बोलावले आहे.
विशेष म्हणजे, व्यवस्थापकीय संचालक पदासाठी ‘एनडीडीबी’, ‘अमूल’, जळगाव सहकारी दूध उत्पादक संघ, ‘वारणा’, ‘राजारामबापू’सह केरळमधील अधिकारीही मुलाखतीसाठी आले आहेत.
प्रत्येकी दोन नावे निश्चित करून ती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर ठेवली जाणार आहेत. नेते यातील एक-एक नाव निश्चित करणार आहेत.
पाचजणांच्या समितीने घेतल्या मुलाखती
व्यवस्थापकीय संचालक व मार्केटिंग व्यवस्थापक पदासाठी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, ‘एनडीडीबी’चे अधिकारी हत्तेकर व खन्ना, महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक शिवप्रसाद पाटील या पाचजणांच्या समितीने मुलाखती घेतल्या आहेत.
‘एनडीडीबी’च्या अधिकाऱ्याला पसंती?
‘गोकुळ’चा वाढता व्याप पाहता व्यवस्थापकीय संचालक पदावर सक्षम अधिकारी आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा आहे. इच्छुकांमध्ये एनडीडीबीचे दोन अधिकारी आहेत, यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.