पावसामुळे गोजगा गावाशेजारील नाल्याजवळचा रस्ता वाहून गेल्यामुळे या ठिकाणी चिखलाच्या दलदलीतून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी गोजगा-उचगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र गावाशेजारी असलेल्या नाल्याजवळ पूल वजा बंधारा बांधणे ऐवजी केवळ पाइप घालण्यात आल्याने हा प्रकार घडला होता. जोरदार पावसामुळे शिवारातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे.
पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या ठिकाणी पूलवजा बंधारा बांधावा, अशी अनेक महिन्यांपासून मागणी केली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हा संपर्क रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
फोटो: १९ उचगाव-गोजगा रोड
उचगाव-गोजगा रस्ता असा पावसाने वाहून गेला.