कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहापैकी तब्बल सहा जागा जिंकून शिवसेनेने दणदणीत विजय मिळविला. भाजपला दोन जागा मिळाल्या. काँग्रेसला मात्र एकही जागा राखता आली नाही. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. सातारा जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि सातारा येथे राष्ट्रवादीचा ‘गजर’ झाला असला तरी पाटणची जागा मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. काँग्रेसने पूर्वीच्याच दोन जागा कायम ठेवल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा १६, ४१८ मतांनी पराभव केला.सांगली संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबर हादरा देत भाजपने सर्वांत जास्त चार जागा मिळवून अव्वल क्रमांक पटकावला. दोन्ही काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असून, राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेने जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आमदारकीचे खाते उघडले आहे. आठही विधानसभा मतदारसंघातील निकालानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सहा माजी मंत्री आणि दिग्गज नेत्यांमुळे जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरल्या होत्या. चुरशीच्या लढतींमुळे अंतिम निकाल येईपर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली होती. जिल्ह्याचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली.
कोल्हापुरात भगवी लाट
By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST