भरत बुटाले - कोल्हापूर ,, ‘सापाला जीवदान, समाजाचे प्रबोधन’ हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेली १८ वर्षे राजेंद्र कदम अविरतपणे सर्पमित्राची भूमिका बजावत आहेत. त्यांनी आतापर्यंत नाग, मण्यार (भारतातील अतिशय दुर्मीळ साप), घोणस, दिवड, तस्कर, धामण, हरणटोळ, त्रावणकोर कवड्या, कवड्या, गवत्या, धूळनागीण, आदी अनेक जातींच्या सापांना जीवदान दिले असून, त्यांची संख्या तीन हजारांवर आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे असलेले कदम हातकणंगले औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत सिक्युरिटी आॅफिसर म्हणून काम पाहतात. परिसरातून कुठूनही आणि कोणत्याही वेळी फोन आला की, ते तातडीने स्वखर्चाने जाऊन अंगाला घाम येईपर्यंत ढिगारा, दगड, विटा स्वत:च उपसतात आणि सापाला पकडतात; कारण सापाच्या भीतीने त्यांना कोणीही मदत करीत नाही. पकडलेला साप पिशवीत सुरक्षितपणे ठेवतात आणि वन विभागाला कळवून सुरक्षित स्थळी त्याला सोडतात. संबंधित ज्या घरात, कारखान्यात साप पकडतात, ते साधा चहासुद्धा विचारीत नाहीत; खर्चाचा तर विषयच नाही, इतका वाईट अनुभव येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आजपर्यंत नोकरीसाठी मुंबई, पिंपरी चिंचवड, सांगली; कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली एम.आय.डी.सी. अशा ज्या-ज्या ठिकाणी ते कार्यरत राहिले, तेथे त्यांनी साप पकडून त्यांना सुरक्षित स्थळी सोडले आहे.आतापर्यंत त्यांना दोन वेळा नाग आणि ३० ते ३५ वेळा इतर सापांपासून इजा झाली आहे.थरारक अनुभव...--हातकणंगले येथे एका घराजवळ धामण जातीचे दोन साप पकडताना लोकांच्या गर्दीतून त्यांतील एक निसटला आणि एकच गोंधळ उडाला. सुसाट पळणाऱ्या सापाला त्यांनी दुसऱ्या हाताने तितक्याच चपळतेने पकडले आहे.--असाच अनुभव निमशिरगाव येथे ५० फूट विहिरीतून साप काढताना आला. विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांना पाणी कमी असल्याने वर येता येत नव्हते. विहिरीत उडी घेऊन शिताफीने दोन्ही सापांना जीवदान दिले, असेही कदम यांनीसांगितले.आजपर्यंत तीन हजार सापांना जीवदान दिले, त्याचबरोबर जनजागृतीही केली. मात्र, येण्या-जाण्याचा खर्च, वेळ, इजा झाल्यावर औषधपाणी यांबाबत कोणी आजपर्यंत दखलही घेतली नाही, याचेच वाईट वाटते. सापांना जीवदान आणि समाजाचे प्रबोधन करताना मात्र मनाला खूप समाधान वाटते. पण महाराष्ट्र शासनाने या कार्याची दखल घेऊन पाठबळ द्यावे. - राजेंद्र कदम
हाक दिली की घटनास्थळी तातडीने हजर१८ वर्षांत ३००० सर्पांना दिले जीवदान
By admin | Updated: August 1, 2014 00:54 IST