लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथील तीन तालुक्यांसाठी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने येथे दिले जाणारे दैनंदिन डोस वाढविण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. जयसिंगपूर येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, खुपिरेचे माजी सरपंच संजय डी. पाटील, ‘कुंभी-कासारी’चे संचालक संजय पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून येथील लसीकरण केंद्रात दररोज मिळणारी डोसची संख्या व लस वाढविण्याची गरज याची माहिती दिली.
खुपिरे येथील ग्रामीण रुग्णालयात करवीर-पन्हाळा-गगनबावडा तालुक्यातील गावातून मोठ्या संख्येने कोरोना लसीकरणासाठी गर्दी होत आहे ४५ वयोगटांतील वरील लाभार्थी लसीकरणासाठी कोटा राखीव ठेवला जात असला तरी शासनाने आता १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्याचे धोरण जाहीर केल्याने दररोज पाचशे ते सहाशे लाभार्थी लसीकरणासाठी येत आहेत. मात्र, लसीकरणासाठी दररोज केवळ दोनशे ते अडीचशे डोस मिळत आहेत. यामुळे अनेक लोकांना रांगेत उभा राहून ही लस मिळत नसल्याने भ्रमनिरास होत आहे.
याशिवाय खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी या गावांतील लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ३५ टक्केच लसीकरण झाले आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळी यांना खुपिरे ग्रामीण रुग्णालयासाठी लस वाढवून देण्यासाठी सांगितले असून, तशी ग्वाही दिली.
फोटो
खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी जादा डोस उपलब्ध करून देण्याचे निवेदन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. वाय. पाटील, संजय पाटील, संजय डी. पाटील उपस्थित होते.