शिरोळ : कर्नाटक राज्य शासनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना घरे बांधण्यासाठी ५ लाख रुपये अनुदान स्वरूपात मदत मिळावी, यासह पूरग्रस्त नागरिकांना निवाऱ्यासाठी जागा व घरे बांधून मिळावीत, दीड वर्षाचे घरभाडे व घर दुरुस्तीचे ९५ हजार रुपये तत्काळ मिळावेत, या मागणीसाठी हेरवाड (ता. शिरोळ) येथील नागरिकांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.
दरम्यान, या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी वयोवृद्ध व सामान्य गरीब कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, हेरवाड येथे ऑगस्ट २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे घरे पाण्याखाली गेली होती. घरांची पडझड झाली आहे, पूरग्रस्त भागातील घरे, कुटुंबांचा सर्व्हे करून, लोकांना सरकार घरे बांधून देणार, असे सांगण्यात आले होते. मात्र दीड वर्ष झाले अद्यापही घरे बांधून मिळाली नाहीत. कर्नाटक राज्यात केंद्र शासनाचे ९५ हजार रुपये अनुदान दिले आहे. दोन वर्षाचे ५० हजार रुपये घरभाडे, शिवाय घरात पाणी आल्याबद्दल दहा हजार रुपये तत्काळ मदत आणि घरबांधणीसाठी राज्य शासनाने पाच लाख रुपये दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासनानेही पूरग्रस्त नागरिक व कुटुंबाला मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनात मच्छिंद्र कांबळे, सुनील कांबळे, सागर आवळे, बेबुताई कुन्नुरे, बाळाबाई बेडगे, अनिता कांबळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.
फोटो - २४०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
शिरोळ येथे तहसील कार्यालयासमोर हेरवाड (ता. शिरोळ) येथील पूरग्रस्त महिलांनी उपोषण सुरू केले आहे.