संदीप बावचे
जयसिंगपूर : गेली २५ वर्षे भाड्याच्या इमारतीत असलेले मुलींचे शासकीय वसतिगृह आता हक्काच्या इमारतीत जाणार आहे. ७५ विद्यार्थिनींसाठी १० कोटी २१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. नवी इमारत साकारल्यानंतर मुलींचा शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास आणखी चांगल्या प्रकारे होण्यास मदत होणार आहे. मोठा निधी मंजूर झाल्यामुळे या वसतिगृहाची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे.
शाळेपासून घर दूर असणे, पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरू ठेवता यावे, या उद्देशाने शासनाने मुलींसाठी वसतिगृहाची योजना अमलात आणली. वसतिगृहातील मुलींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी १९९६ साली जयसिंगपूर येथील काडगे मळा येथे मुलींचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले. ७५ मुलींसाठी हे वसतिगृह असून, गेली २५ वर्षे भाडेतत्त्वावर ही इमारत घेण्यात आली आहे. वसतिगृहाकडे अधीक्षका, लिपिक, स्वयंपाकी, मदतनीस, पहारेकरी, शिपाई असा कर्मचारी वर्ग आहे.
चौकट
२५ वर्षे भाडेतत्त्वावर इमारत
शिरोळ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. अनेक शैक्षणिक संस्था याठिकाणी असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाच्या निमित्ताने शहरात येतात. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. गेली २५ वर्षे भाडेतत्त्वावरील इमारतीत सोयीसुविधा देण्यास मर्यादा येत आहेत. नव्या इमारतीनंतर चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
अशा होणार सुविधा
आंबेडकर सोसायटीजवळ इमारत बांधकामासाठी ४७ गुंठे जागा आरक्षित आहे. २५ गुंठ्यांमध्ये इमारत बांधकामाचे नियोजन आहे. यामध्ये तळमजला, विद्यार्थिनींसाठी खोल्या, संगणक कक्ष, किचन, डायनिंग हॉल, प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, ग्रंथपाल कक्ष, व्यायाम शाळा, मल्टिपर्पज सभागृहाशिवाय अधीक्षक यांच्यासाठी निवासस्थान व कार्यालय अशा सुविधा असणार आहेत.
कोट -
जयसिंगपूर शहरात मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाची आणि निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने शंभर विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या वसतिगृहासाठी १६ कोटी ५५ लाख रुपयांचा आराखडा शासनाला दिला होता. पहिल्या टप्प्यात ७५ विद्यार्थिनींसाठी निधी मंजूर झाला आहे.
- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री
फोटो - २४०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे भाडेतत्त्वावर सध्या असलेले मुलींचे वसतिगृह.