कोल्हापूर : महाराष्ट्र हायस्कूल, छत्रपती शाहू विद्यालय, चाटे माध्यमिक, प्रायव्हेट हायस्कूल या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, तर मुलींमध्ये उषाराजे हायस्कूल व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आज, सोमवारी दोन्ही संघांत अंतिम लढत होणार आहे. संभाजीनगर रेसकोर्स येथील विभागीय क्रीडासंकुलात रविवारी सकाळी १७ वर्षांखालील मुले गट उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने नूतन मराठी विद्यालयाचा ६-० असा धुव्वा उडविला. ‘महाराष्ट्र’कडून पवन सरनाईकने दोन, तर अनिकेत जोशी, शाहू भोईटे, संकेत साळोखे, सौरभ पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. छत्रपती शाहू विद्यालयाने शाहू दयानंदचा २-० असा पराभव केला. ‘शाहू’कडून सर्वेश पेडणेकर, स्वप्निल भोसले यांनी प्रत्येकी एक गोल केला. चाटे माध्यमिकने स. म. लोहिया हायस्कूलचा ३-० असा टायब्रेकरवर पराभव केला. प्रायव्हेट हायस्कूलने शिवाजी मराठा हायस्कूलचा १-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तत्पूर्वी, दुसऱ्या साखळी सामन्यात छत्रपती शाहू विद्यालयाने चाटे हायस्कूलचा पराभव केला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये उपांत्य फेरीत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूलचा टायब्रेकरवर ३-० असा पराभव केला, तर उषाराजे हायस्कूलने चाटे स्कूलचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. ‘उषाराजे’कडून ऋतुजा सूर्यवंशीने दोन, तर प्रिया कणबरकर हिने एक गोल नोंदवला. आज पोद्दार विरुद्ध उषाराजे यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
मुलींच्या गटात ‘उषाराजे’ विरुद्ध ‘पोद्दार’ यांच्यात अंतिम लढत होणार
By admin | Updated: July 27, 2015 00:43 IST