आजरा : आजऱ्यातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराने वाचकांबरोबर साहित्यिकांनाही बळ दिले. त्यामुळे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही साहित्यकृती तयार झाली. त्याच पद्धतीचे अनेक साहित्यिक परिसरात घडले, असे स्पष्ट प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी सावंत स्मृतिदिन व साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.
दीपप्रज्वलन व शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. नंदकुमार मोरे व मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक आणि पुरस्कार विजेत्यांची नावे डॉ. अशोक बाचुळकर यांनी जाहीर केली. मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदकिशोर भोळे यांच्या अनुबंध कादंबरीला, दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्रमोद कोयंडे यांच्या सोबतीण कथासंग्रहाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय साहित्यकृती पुरस्कार डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या टिपवंणी या साहित्यकृतीला, तर बाल साहित्य पुरस्कार संयुक्ता कुलकर्णी यांच्या धमाल एकांकिकेला मिळाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सदाशिव मोरे, तर पाहुण्यांचा परिचय कार्यवाह विजय राजोपाध्ये यांनी करून दिला. कार्यक्रमास प्रा. राजा शिरगुप्पे, अब्दुल नेसरीकर, वाचनालय संचालक सुभाष विभूते, वामन सामंत, डॉ. अंजनी देशपांडे, संभाजी इंजल, विद्या हरेर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखिल कळेकर यासह नागरिक उपस्थित होते. आभार उपाध्यक्षा गीता पोतदार यांनी मानले.
फोटो कॅप्शन - आजऱ्यातील मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृतिदिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. नंदकुमार मोरे यांनी संबोधित केले. शेजारी सदाशिव मोरे, डॉ. अशोक बाचुळकर, विजय राजोपाध्ये, गीता पोतदार उपस्थित होते.