जयसिंगपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघा अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. शिरोळ-जयसिंगपूर मार्गावरील चौंडेश्वरी फाट्यानजीक असणाऱ्या मंगोबा देवालयाजवळ आज, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या संशयिताना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून धारदार हत्यारे, चटणीपूड व तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. वृषभ आण्णासाहेब उपाध्ये (वय २८), सावकार रावसाहेब चौगुले (२१) संतोष बजरंग सोनटक्के(२२, तिघे रा. हुंडा चौक, माणकापूर, ता. चिकोडी) व शुभम ऊर्फ गुंडा राजेंद्र साळुंखे (१९, रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे असून, एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला, तर मुख्य सूत्रधाराला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडून घरफोडी, महिलांच्या गळ्यातील धूमस्टाईलने दागिने लंपास यांसह जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, जयसिंगपूर शहरालगत असणाऱ्या चौंडेश्वरी फाट्याजवळील मंगोबा देवालयाजवळ तीन मोटारसायकलसोबत चौघे संशयित असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत येथील पोलिसांना मिळाली होती. आज, सायंकाळी पथकाने छापा टाकला असता, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने संशयिताजवळ हत्यारे व साहित्य मिळाले. त्यांच्याकडून पल्सर मोटारसायकल असून, मागील बाजूस नंबरप्लेट नव्हती, तर हीरो कंपनीची मोटारसायकल असून, तिसऱ्या मोटारसायकलवर नंबरप्लेट नव्हती. या संशयिताकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड
By admin | Updated: November 28, 2014 00:32 IST