बाबासाहेब नेर्ले
लोकमत न्यूज नेटवर्क
गांधीनगर : पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी गांधीनगर व्यापारी पेठ सावकारी पाशात पुरती अडकल्याचे विदारक चित्र आहे. येथील अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. परिणामी भरमसाठ व्याजामुळे येथील व्यापारी पुरता कोलमडला आहे. पाच टक्क्यांपासून ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे सामान्यांसह गरजू व्यापाऱ्यांना खिंडीत गाठणाऱ्या सावकारांविरोधात आता पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडण्याची गरज आहे.
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन झाल्यानंतर गांधीनगर व्यापारी पेठेला त्याची पहिली झळ बसली. नागरिकच घरातून बाहेर पडत नसल्याने येथील व्यापारी पेठेतील व्यवसाय ठप्प झाला. ही परिस्थिती जवळपास आठ महिने अशीच राहिल्याने अनेक व्यापाऱ्यांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. दुकानाचे वारेमाप भाडे, कामगारांचे पगार व इतर खर्चांचा ताळमेळ करणे त्यांना नाकीनऊ आले. त्यातून आर्थिक गणित कोलमडल्याने अनेक व्यापाऱ्यांनी सावकारांचे उंबरठे झिजवले. मग सावकार सांगेल त्या व्याजदराने त्याच्याकडून कर्ज घेतले. मात्र, आता अव्वाच्या सव्वा दराने व्याजाची वसुली सावकारांकडून होत असल्याने व्यापारी पुरते हैराण झाले आहेत. सावकारांच्या तगाद्याला कंटाळून अनेकांनी आपला व्यवसाय गुंडाळला आहे. त्यामुळे अवैध सावकारकीला आळा घालण्याची मागणी होत आहे.
चौकट
वारंवार वाद... पण तक्रार कोणीच देईना
सावकारांकडून मनमानी पध्दतीने व्याजाची वसुली होत असताना व्यापारी-सावकारांमध्ये वारंवार वाद, मारमारीचे प्रकार होत आहेत. मात्र, असे असूनही व्यापाऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार केली जात नसल्याने अवैध सावकारकी चांगलीच बोकाळली आहे.
सावकारी विळख्यात तरुणाईही...
सावकारांनी व्यापाऱ्यांबरोबर येथील तरुणाईलाही आपले शिकार बनवले आहे. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या तरुणाला गाठून त्याला कर्ज द्यायचे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून व्याजाची वसुली करायची, असा नवा फंडा सावकारांनी अवलंबला आहे.
कोट : गांधीनगर परिसरातील व्यापारी किंवा सामान्य नागरिकांना जर सावकारांचा त्रास होत असेल तर नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याची गरज आहे. फिर्यादीच्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- दीपक भांडवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे