गांधीनगर : पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची येथे झुंबड उडाली आहे. कर्नाटक, गोवा, कोकण, अशा अनेक ठिकाणांहून खरेदी करण्यासाठी लोकांचा महापूर उसळत आहे.गांधीनगरात अनेक प्रकारच्या कटलरी, कपड्यांची दुकाने, तसेच फटाके, फुटवेअर दुकाने आहेत. त्यामुळे येथे जे साहित्य मिळते ते माफक दरात मिळत असल्याने परिसरातील नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, अनेक व्यापाऱ्यांनी खास दिवाळी आॅफर काढल्याने ग्राहकांना माफक दरात अनेक वस्तू खरेदी करता येत असल्याने गांधीनगर हाऊसफुल्ल झाले आहे. सकाळपासूनच गर्दी वाढत आहे. ती रात्री उशिरापर्यंत खरेदी करण्यासाठी लोक गांधीनगरात येत असल्याने व्यापाऱ्यांनीही दुकानांच्या वेळेत बदल केले आहेत. टी.व्ही., फ्रिज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आकाशकंदील, प्लास्टिक फुलांच्या माळा, सजावटीचे साहित्य, फराळाचे साहित्य, अशा अनेक वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर किरकोळ व्यापाऱ्यांनी रस्त्यावर स्टॉलही मांडले आहेत. दरम्यान, गांधीनगरात मेन रोडवर प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतुकीचे मात्र तीनतेरा वाजले आहे. अनेक वाहनांचे लोंढे येत असल्याने ‘ट्राफिक जाम’ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. पार्किंग सुविधा असल्याने रस्त्यावरच वहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून, बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना आणि गांधीनगरातून बाहेर पडणाऱ्यांना ताटकळत रस्त्यावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत व्हावी, अशी व्यापारी तसेच वाहनधारकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
गांधीनगर हाऊसफुल्ल
By admin | Updated: October 14, 2014 23:23 IST