कोतोली : भाचरवाडी (ता. पन्हाळा) येथील खून प्रकरणातील संशयित आरोपी पोपट श्रीपती गायकवाड याच्या घरावर मृत सूर्यदीप राजाराम पाटील यांच्या संतप्त नातेवाइकांनी हल्लाबोल करून प्रचंड नुकसान केले. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री घडली. याबाबतची माहिती अशी कोलोली (ता. पन्हाळा) येथील सूर्यदीप पाटील यांच्या पत्नीची छेड तिच्या माहेरमधील पोपट गायकवाड काढत होता. यातून सूर्यदीप व आरोपी पोपट यांच्यात दोन वेळा भांडण झाले होते. पोपट गायकवाड याने कालही शुक्रवारी सूर्यदीप यांच्या पत्नी व सासरे यांना शिवीगाळ केली. त्यातून वादावादी होऊन पोपट गायकवाड याने बंदुकीतून गोळी झाडून सूर्यदीप यास जखमी केले होते. रात्री सूर्यदीप हे मृत झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाइकांनी भाचरवाडी येथे येऊन गोंधळ घातला. काही अनुुचित प्रकार घडू नये म्हणून पन्हाळा पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्या घरासमोर बंदोबस्त ठेवला होता; परंतु काही अंतरावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यावर व त्यामध्ये असणाऱ्या बोलेरो गाडीवर हल्ला करून पेटवून दिले. त्यामध्ये बोलेरो गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पोलिसांना हे समजताच सर्व पोलीस तिकडे गेले असता. काही लोकांनी आरोपी गायकवाड याच्या राहत्या घरासह त्याच्या चुलत्याच्या घरावर हल्ला करून तिजोरी, दोन रंगीत टी.व्ही. संच व इतर साहित्य पूर्णपणे फोडून टाकले. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर जमाव निघून गेला. दरम्यान, पन्हाळा पोलिसांनी आरोपी पोपट याचे वडील श्रीपती दादू गायकवाड, आई रंगूबाई गायकवाड, व पत्नी शोभा पोपट गायकवाड यांना ताब्यात घेतले असून आरोपी पोपट गायकवाडचा शोध घेत आहेत. मृत सूर्यदीप पाटील यांच्यावर शनिवारी सकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सूर्यदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.
गायकवाडच्या घरावर हल्ला
By admin | Updated: June 15, 2014 01:51 IST