कोल्हापूर: देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या गडहिंग्लजच्या महादेव तोरस्कर यांच्या वीरपत्नी वृषाली तोरस्कर यांचा घरकुलासाठीचा संघर्ष १४ वर्षांनंतर सुरुच आहे. शासनानेच दिलेल्या जागेवरून न्यायालयीन लढाई आणि प्रशासकीय टोलवाटोलवीने वैतागलेल्या या वीरपत्नीने आता प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.
यासंदर्भात आजी-माजी सैनिक संघटनेने शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली. तोरस्कर हे २००१ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर शहीद झाले. त्यांच्या पत्नी वृषाली यांना बड्याचीवाडी विजयनगर येथील दोन गुंठ्यांचा प्लॉट दिला गेला. २००८ मध्ये तेथे बांधकामही सुरू केले. निम्मे बांधकाम झाल्यावर पेशाने डॉक्टर व शिक्षक असलेल्या दोघांनी ही जागा ओपन स्पेसची असल्याने बांधकामास अडवणूक केली. अखेर हा वाद न्यायालयात गेला. १४ वर्षांपासून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासंदर्भात तोरस्कर यांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पागरे यांना फोनवरून पर्यायी जागा देण्यास सांगितले, पण जागा उपलब्ध नाहीत, तोरस्कर यांनी जागा सुचवावी, ती देऊ, असा अभिप्राय तहसीलदारांनी कळवला आहे. तहसीलदारांनी जागा शोधायची की मी घरदार सोडून कुठे जागा शोधू, अशी संतप्त विचारणा तोरस्कर यांनी केली.
शासन आम्हाला बेदखल करून पतीच्या शहीद होण्याचा सन्मान राखला जाणार नसेल तर आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पतीच्या मृत्यूचे दु:ख पचवून मुलालाही लष्करी सेवेत घातले; पण शहिदांच्या कुटुंबीयांचा मान राखला जात नसेल तर जगणे नकोच, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वृषाली तोरस्कर यांनी व्यक्त केली.
फोटो : २१०१२०२१-कोल-वृषाली तोरस्कर-वीरपत्नी