ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांची नाहक बदनामी करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी लोकवर्गणीतून १० लाख रुपये देण्याचा निर्णय गडहिंग्लजकरांनी घेतला आहे. गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीतर्फे प्रसिद्धी पत्रकातून ही माहिती देण्यात आली.
गडहिंग्लज शहरातील विविध समाजबांधव, संघटना, तरुण मंडळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून ही रक्कम उभी करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ही रक्कम सुपुर्द केली जाणार आहे.
पत्रकात म्हटले आहे, बदनामीच्या रूपाने आलेल्या संकटाच्या काळात कर्तव्य भावनेतून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खारीचा वाटा म्हणून ही रक्कम देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. लोकनेत्यावर झालेले आरोप हे दुर्दैवी व निषेधार्ह आहेत. केवळ लोकसेवेच्या जोरावर ५ वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्या बदनामीचे षङयंत्र पूर्वनियोजित आणि राजकीय संस्कृतीला कलंकित करणारे आहे. पत्रकावर, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष गुंड्या पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा शर्मिली मालंडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.