गडहिंग्लज : गडहिंग्लज बाजार समितीला ऊर्जितावस्था देण्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधण्यावरच प्रशासक मंडळाचा भर आहे. कोरोनामुळे सेस वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे थकीत १ कोटी १० लाखांच्या सेस वसुलीसाठी विशेष मोहीम राबविणार आहे, अशी माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवार (दि. २७) प्रशासक मंडळाची बैठक झाली. त्यात झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली. मागे काय झाले? यापेक्षा संस्थेच्या भविष्यासाठी काय करता येईल? यासंदर्भात कृतीशील उपाययोजनेला प्रशासक मंडळाचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देसाई म्हणाले, उत्पन्नवाढीसाठी गडहिंग्लज बाजार समिती आवारासमोरील दुकानगाळ्यांच्या भाड्यात वाढ आणि आवारातील भूखंडधारकांकडून भुईभाडे वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून गडहिंग्लजमध्ये १ हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोडावून बांधण्यात येत आहे. त्याचबरोबर डिझेल व पेट्रोलपंप सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल. तुर्केवाडी बाजार समितीच्या आवारातही दुकानगाळे बांधण्याचे नियोजन आहे. त्यातूनही बाजार समितीला कायमस्वरूपी उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. नगरपालिकेकडून प्रस्ताव आल्यास बाजार समितीच्या आवारात भाजीपाला बाजार भरविण्याचाही विचार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रशासक मंडळाचे सदस्य राजेंद्र गड्यान्नावर, प्रा. सुनील शिंत्रे, राजशेखर यरटे, सोमगोंडा आरबोळे, जयकुमार मुन्नोळी, संजय भोकरे, बाळासाहेब चौगुले, सचिव बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
----
* अभय देसाई : २८०१२०२१-गड-०३