कऱ्हाड : ‘एफआरपी’ची रक्कम एकरकमी मिळणार का, याची उत्कंठा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, अशी सरकारचीही भूमिका आहे. मात्र, साखरेचे भाव कमी असल्याने कारखानदारांसमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना मदत व्हावी म्हणून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही साखर कारखानदारांना सूट देण्यात येणार असून, खरेदी कर माफ करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील होते. सहकार, जलसंधारणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी, नागरी आरोग्य, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार शंभूराज देसाई, आमदार नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, अॅड. उदय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मनोज घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात गतवर्षी २४ हजार गावांमध्ये दुष्काळ होता, तर यावर्षी १५ हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी उसाला एकरकमी एफआरपी मिळावा, ही मागणी करीत आहे, तर दुसरीकडे कारखान्यांकडूनही अनुदानाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही सातशे कोटी रुपयांची मदत देणार आहोत. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्यात आघाडीवर आहे. नव्वद टक्के उसाचे एफआरपी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.’ जयंत पाटील म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी कोयना धरणात पाणी साठा कमी असल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. जर ऊस उत्पादीतच झाला नाही तर कारखाने चालणार कसे आणि कारखान्यापेक्षा शेतकरी महत्त्वाचे आहेत.’ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेत तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांचा अपघात विमा दिला जाणार आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करावयाचा आहे. राज्यातील साडेसहा हजार गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे.’ ( प्रतिनिधी)एका वानराने केली धमाल !कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनस्थळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर या पशु-पक्षी प्रदर्शनात चक्क एका वानराने हजेरी लावली. हे वानर चक्क व्यासपीठासमोरील ‘डी’ झोनमध्ये फिरू लागले. ते व्यासपीठावर जाते की काय या धास्तीने पोलीस हतबल झाले होते; पण त्यातील एका कर्मचाऱ्याने शक्कल लढविली. कोठून तरी एक पाव आणला आणि तो पाव बाजूला ठेवताच माकड ‘डी’ झोनमधून गेले खरे, मात्र नजीकच्या शेजारच्या एका झाडावर बसून त्याने मन लावून सर्वांची भाषणे ऐकली.
‘एफआरपी’साठी कारखान्यांना सूट!
By admin | Updated: November 26, 2015 00:09 IST