गडहिंग्लज : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी समाजबांधवांनी बकरी-मेंढ्यांसह प्रांत कचेरीवर मोर्चा काढला. गडहिंग्लज तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी या मोर्चाने बारामतीमधील राज्यव्यापी आंदोलनास पाठिंबा दिला. गडहिंग्लज तालुका धनगर समाज संघ व मल्हार सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, संकेश्वर रोड, कांबळे तिकटी ते आयलँड मार्गे प्रांत कचेरीवर आल्यानंतर सभा झाली. धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांत कचेरीच्या गेटवर चिकटविण्यात आले. सभेत प्रा. विठ्ठल बन्ने, जनता दलाचे ज्येष्ठ नेते अॅड. श्रीपतराव शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांची भाषणे झाली. मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, मल्हार सेनेचे उपाध्यक्ष संजय कट्टीकर, प्रा. डॉ. नागेश मासाळ, प्रा. नीलेश शेळके, सिद्धाप्पा भरडी, निंगाप्पा भमानगोळ, विठ्ठल भमानगोळ, अरुण वाघमोडे, सुभाष पुजारी, आप्पासाहेब कट्टीकर, बाळासाहेब वालीकर, शंकर मदिहाळी, सुहास पुजारी, म्हाळू बन्ने, सुहास पुजारी, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गडहिंग्लजमध्ये बकरी-मेंढ्यांसह मोर्चा
By admin | Updated: July 29, 2014 00:02 IST