रत्नागिरी : जानेवारी महिन्यापासून संगणक परिचालक मानधनाविना कार्यरत आहेत. संगणक परिचालकांबाबत कोणताही निर्णय शासनाने न घेतल्यामुळे राज्यातील २७ हजार संगणक परिचालकांनी दि. १२ एप्रिल रोजी विधानसभेवर धडकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हटणार नसल्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे.संग्राम प्रकल्पांतर्गत २७ हजार संगणक परिचालक गेली चार वर्षे कार्यरत आहेत. महाआॅनलाईन कंपनीकडून ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. प्रामाणिक काम करून संगणक परिचालकांनी सलग तीन वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्रमांकावर ठेवला. तरीही महाआॅनलाईन कंपनीने संगणक परिचालकांची पिळवणूक करून ४ वर्षात मानधन, स्टेशनरी यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला. संगणक परिचालकांना दैनंदिन ५० ते २०० रूपये तर मासिक ५०० ते ३८०० रूपये इतके मानधन देऊन आर्थिक व मानसिक त्रास कंपनीने दिला. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे यातील चार संगणक परिचालकांनी आत्महत्याही केली. संगणक परिचालकांना कुठल्याही खासगी कंपनीकडून नियुक्ती न देता थेट जिल्हा परिषदेकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन १५ हजार रूपये द्यावे, या प्रमुख मागणीसाठी गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे. वेळोवेळी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे आठ दिवस आंदोलन सुरु असताना शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्री यांनी २२ डिसेंबर २०१५ ला १५ जानेवारी २०१६पर्यंत मागण्यांबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. परंतु, एप्रिल महिना आला तरीही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने १२ एप्रिल रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ेहरीश वेदरे : आश्वासनानंतर वेळोवेळी आंदोलन मागेयापूर्वी शासनाच्या आश्वासनांनंतर वेळोवेळी आंदोलन मागे घेण्यात आले. नागपूर येथे दिलेला शब्द शासन पाळेल अशी अपेक्षा संघटनेला होती. मात्र, गेले तीन महिने विना मोबदला संगणक परिचालक कार्यरत आहेत. एकीकडे महागाईचा डोंगर वाढत असतानाच संगणक परिचालक मात्र मोबदल्यापासून वंचितच आहेत. शासनाने आॅगस्ट महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी संगणक परिचालकांना उपासमारीने दिवस काढावे लागत आहेत. अखेर कंटाळलेल्या संगणक परिचालकांनी विधानभवनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरीश वेदरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कामाला विरोधराज्यात काम करणाऱ्या संगणक परिचालकांनी मानधनासाठी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. संग्राम अंतर्गत काम करणाऱ्या परिचालकांना आता आधारकार्ड नोंदणीची कामे देण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र, त्याला विरोध करण्यात आला आहे.
संगणक परिचालकांचा मोर्चा
By admin | Updated: April 9, 2016 00:54 IST