मनोज मुळ््ये- ----काँग्रेसची पताका खांद्यावर घेऊन मूळ आक्रमक स्वभावाला मुरड द्यावी लागल्याने नारायण राणे यांचा काँग्रेसमधील एकूणच प्रवास अस्वस्थ आणि अस्थिर असाच आहे. काँग्रेसमधील नऊ वर्षांच्या प्रवासात त्यांनी पक्षाच्या धोरणावर आक्षेप घेत दुसऱ्यांदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कमी झालेले समर्थक आणि सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांनी घेतलेली तोंड फिरवण्याची भूमिका या पार्श्वभूमीवर राणे यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे चौथे वळण धोकादायक ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.घर सोडून मुंबईची वाट धरलेल्या या कोकणच्या सुपुत्राने ७0च्या दशकात आपली राजकीय वाटचाल शिवसेनेतून सुरू केली. ते प्रथम चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर नगरसेवक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून त्यांना बेस्टचे चेअरमन केले. या काळात त्यांनी दाखवलेल्या आक्रमकतेचे शिवसेनेत कौतुक झाले आणि १९९0 मध्ये ते मालवण-कणकवली मतदार संघातून आमदार झाले. तेव्हापासून सहावेळा ते आमदार झाले. आक्रमकता या एकाच निकषावर आमदारकीच्या या सहा टर्म्समध्ये त्यांना विविध खात्यांचे मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतेपद मिळाले. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर राणे यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले. म्हणूनच १९९५ मध्ये शिवसेना-भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यानंतर मानाचे महसूल मंत्रीपद त्यांना मिळाले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जवळीक असल्याने १ फेब्रुवारी १९९९ ते १७ आॅक्टोबर १९९९ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवले.१९९९ मध्ये शिवसेना-भाजपकडून सत्ता गेल्यानंतर ते विरोधी पक्षनेते झाले. २00५ मध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे कार्यकारी प्रमुखपद जाहीर झाले. त्यावर राणे यांनी थेट टीका केली होती. त्याच काळात ते आणि शिवसेना यात दरी पडत गेली. अखेर ३ जुलै २00५ रोजी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केला. अर्थात राणे यांनीही शिवसेना सोडण्याचा निर्णयही तेव्हाच जाहीर केला. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत राणे यांनी ६३ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. शिवसेनेचे परशुराम उपरकर यांची अनामत रक्कमही जप्त झाली. सेनेच्या इतिहासात प्रथमच असे घडले होते. काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर राणे यांना महसूल मंत्रीपद देण्यात आले. २00८मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पदावरुन बाजूला करण्यात आले. तेव्हा या पदावर राणे यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र अचानक अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले आणि त्यांची संधी हुकली. पक्षाकडून मिळालेला शब्द पाळला गेला नाही आणि मुख्यमंत्रीपदाची संधी गमावल्याने संतप्त राणे यांनी काँग्रेस नेतृत्त्वावर कडाडून टीका केली आणि महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुंबई दहशतवादी हल्ल्यामागे काँग्रेसचा एक बडा नेता आहे, त्याने दहशतवाद्यांना मदत केली, या राणे यांनी केलेल्या आरोपाची दखल घेत २00८मध्ये काँग्रेसमधून त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले.या निलंबनाची आणि राणे यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा झाली होती. अखेर राणे यांनी नमती भूमिका घेत हायकमांडसमोर दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसने त्यांना क्षमापित करून पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले. अर्थात यावेळी त्यांना महसूलऐवजी उद्योगमंत्री पद देण्यात आले.फेब्रुवारी २00९मध्ये ते काँग्रेसमध्ये पुन्हा रूजू झाले. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या आक्रमक स्वभावात बराच बदल झाला. जाहीर टीका करणे त्यांनी जवळजवळ बंदच केले. काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासून नऊ वर्षे आपण आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालत काँग्रेस कल्चर आत्मसात केल्याचे त्यांनी स्वत:ही उद्विग्नपणे मान्य केले आहे. म्हणूनच ‘आदर्श’ प्रकरणात अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आले, तरी राणे यांनी आपली नाराजी व्यासपीठावर आणली नाही.आता मात्र राणे यांचा आक्रमक स्वभाव पुन्हा पुढे आला आहे. लोकसभा निवडणुकीत अगदीच अनपेक्षित असलेला पराभव पाहावा लागल्यामुळे आधी ते काहीसे दुखावले गेले होते. या पराभवाची दखल घेऊन त्यांना अपेक्षित असलेले बदल केले गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कल्चर झुगारून देत आपला मूळ स्वभाव पुढे आणला आहे. राजीनामा देताना हायकमांड आणि मुख्यमंत्री यांच्यावर त्यांनी केलेली टीका आणि येऊ घातलेली विधानसभा निवडणूक पाहता आपला मूळ आक्रमकपणा त्यांनी पुढे आणला आहे.आतापर्यंत राणे यांच्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्रिपद, शिवसेनेतून बाहेर पडणे आणि काँग्रेसच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे असे तीन महत्त्वाचे टप्पे आले होते. आज सोमवारी दिलेला राजीनामा हा त्याचा चौथा टप्पा आहे. कालपर्यंतच्या तीन टप्प्यांपैकी मुख्यमंत्रिपद हा त्यांच्या दृष्टीने सकारात्मक भाग होता. मात्र, उर्वरित दोन महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अनेक लोक त्यांच्यासोबत होते. त्यांच्या पाठीशी असलेले लोक हेच त्यांचे मुख्य हत्यार होते. पण, यावेळेच्या त्यांच्या नाराजीला (ज्याला बंड मानण्यास राणे तयार नाहीत) नेमकी किती लोकांची साथ आहे, याचे उत्तर काहीसे संदिग्धच मिळत आहे.राजन तेली, काका कुडाळकर, श्रीकांत सरमळकर, गौरीशंकर खोत यांच्यासारखी जवळची माणसे आता राणे यांच्यासोबत नाहीत. रवींद्र फाटक यांनी तर सहा नगरसेवकांसह पुन्हा जुने घर गाठले आहे. याहीव्यतिरिक्त पदे न मिळालेली किंवा या ना त्या कारणाने दुखावलेली अनेक माणसे राणे यांच्यापासून मनाने लांब गेली असल्याचे चित्र अलिकडे दिसू लागले आहे.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाकडे पाहता सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनताही त्यांच्यापाठीशी उभी नाही, असेच दिसत आहे. एका बाजूला जवळची माणसे दुरावली गेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसेही दुरावली आहेत. सिंधुदुर्गातील स्नेहमेळाव्यातही भाषणे करणाऱ्यांनी केवळ अतिरेकी गुणगान करण्यापलिकडे काहीच मांडलेले नाही. आसपासची ही फळी नसल्यामुळे आता राणे यांनी घेतलेले चौथे वळण यशस्वी ठरणार की नाही, हाच प्रश्न आहे.राणे यांनी अन्य पक्षात जाण्याची भूमिका घेतली तर त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये आलेले सर्वजण त्यांच्यापाठून जातील का? राणे काँग्रेसमध्येच राहिले तर त्यांनी केलेल्या आजच्या कडवट टीकेनंतरही त्यांना मानाचे स्थान मिळेल का? आपल्या पुढच्या वाटचालीवर राणे यांनी कोणताच प्रकाश न टाकल्याने कार्यकर्ते संभ्रमित आहेत. त्यामुळे राणे यांचे आताचे हे वळण त्यांना पुढे घेऊन जाईल का, हा प्रश्नच आहे.
राणें यांचे हे चौथे वळण धोकादायकच?
By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST