कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्यात सोमवारी सूर्याची किरणे सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली. एक मिनिट स्थिर होऊन याठिकाणीच लुप्त झाली. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नाही, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी सोमवारी हा सोहळा नजरेत साठविण्यासाठी स्थानिकांसह परजिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मावळतीची किरणे सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी मंदिरात अवतरली. ५ वाजून ४५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तिथून ५ वाजून ४६ ते ४८ मिनिटांपर्यंत किरणे देवीच्या गुडघ्यांवरून कमरेपर्यंत पोहोचली. त्यानंतर ती कमरेवरच लुप्त झाली. ढगांचा अडथळा आल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नाही. मंगळवारी किरणोत्सवाचा पाचवा व शेवटचा दिवस आहे. ढगाळ वातावरण नसेल तर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल, असे खगोलशास्त्रीय अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. दिवाळीची सुट्टी असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती.>किरणांचा प्रवास असामहाद्वार दरवाजा ५ वाजून२ मिनिटे, गरुड मंडप ५.०७ मिनिटे, गणपती मंदिरपाठीमागील बाजूस५.२३ मिनिटे, कासव चौक ५.३२ मिनिटे, पितळी उंबरा ५.३६ मिनिटे, गाभाऱ्यातील आतील पायरी ५.४१ मिनिटे, चरणस्पर्श - ५.४५ मिनिटे, कमरेवर - ५.४७ मिनिटे.करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सव सोहळ्यात चौथ्या दिवशी सोमवारी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली होती.
चौथ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:29 IST