उत्तूर : गडहिंग्लज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या चार युवतींनी सोमवारी नदीजवळ कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या चौघीही चुलत बहिणी असून अभ्यासाच्या भीतीने त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या चौघींनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. या युवती आजरा तालुक्यातील कर्नाटक सीमेजवळील एका गावातील आहेत.अधिक माहिती अशी, या चौघीही युवती कला, वाणिज्य शाखेत अकरावी व बारावीमध्ये शिकतात. त्या सकाळी बसने कॉलेजसाठी गडहिंग्लजला आल्या. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी कीटकनाशक पावडर विकत घेतली. त्यानंतर त्या नदीकडे गेल्या. तेथे एका मंदिराजवळ पाण्यात कीटकनाशक मिसळून त्यांनी ते प्राशन केले. चौघींनाही मळमळू लागल्याने त्यांची अवस्था कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या लक्षात आली. त्यांनी या युवतींकडे विचारणा करताच आपण कीटकनाशक प्राशन केल्याचे चौघींनी सांगितले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील दोन मुलींनी अधिक कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. (वार्ताहर)
गडहिंग्लज येथे चार युवतींचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: December 22, 2015 01:07 IST