कोल्हापूर : कोल्हापुराच्या नाट्यचळवळीत सातत्याने नवनवीन प्रयोग सादर करीत रसिकांना दर्जेदार नाटकांचा आस्वाद देणाऱ्या काळम्मावाडी येथील श्री हनुमान तरुण मंडळाच्या ‘वंदे मातरम् अर्थात गोंधळ मांडियेला’ या नाटकाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या स्पर्धेत चार नामांकने मिळाली आहेत, तर नाटकाचे लेखक सुनील माने यांना उत्कृष्ट संहिता लेखनासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘झी मराठी’च्या वतीने झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या व्यावसायिक विनोदी नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नामांकित नाट्यसंस्थांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत काळम्मावाडीच्या वंदे मातरम् अर्थात गोंधळ मांडियेला या नाटकाची अंतिम तीन नाटकांत निवड झाली, तर लेखक सुनील माने यांना संहिता लेखनासाठी झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट प्रयोग, उत्कृष्ट संहिता, उत्कृष्ट सहायक अभिनेता, उत्कृष्ट सहायक अभिनेत्री अशी चार नामांकने या नाटकाला मिळाली. गतवर्षी कोल्हापुरात झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेतही या नाटकाने बक्षिसांची लयलूट केली होती. अभिनय कलेची आवड असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी मिळून स्थापन केलेल्या या नाट्यसंस्थेने निर्माण केलेले पहिले नाटक म्हणजे धरणाखालच्या अंधारातून. कथा नामा जोग्याची, सासू ४२० अशा विविध प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांद्वारे या संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेसह व्यावसायिक रंगभूमीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सुनील माने यांनी विविध नाटकांसह चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले आहे. (प्रतिनिधी)
'वंदे मातरम्'ला चार नामांकन
By admin | Updated: August 25, 2014 23:11 IST