निपाणी : चिकोडी, संकेश्वर आणि सोलापूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातांत तीनजण ठार झाले, तर एका बालकाचा खेळताना पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. उमर इकबाल धोरी (रा. बावान सौंदत्ती), दत्ता निंगाप्पा यवंटे (रा. येडुरवाडी), दुंडाप्पा यडवाप्पा सनदी (रा. नरसिंगपूर) अशी तीनजणांची नावे आहेत, तर सुप्रित सुभाष खानाई (वय ९, रा. सोलापूर) असे मृत बालकाचे नाव आहे.दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन चिकोडी-अंकली रस्त्यावरील सिद्धापूरवाडी क्रॉसजवळ अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीचालक उमर धोरी हा जागीच ठार झाला, तर मागे बसलेला महमद अली मुल्ला (रा. एकसंबा) आणि दुसऱ्या दुचाकीवरील दत्ता यवंटे हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यापैकी यवंटे यांचा मृत्यू झाला. चिकोडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.पुणे-बंगलोर महामार्गावर संकेश्वरजवळील काटाबळीनजीक कारने बैलगाडीला जोराची धडक दिली. या अपघातात दुंडाप्पा सनदी (२०, रा. नरसिंगपूर) हा जागीच ठार झाला, तर यल्लाप्पा सनदी (४५) हा गंभीर जखमी झाला आहे. मृत दुंडाप्पा हा वडिलांसमवेत बैलगाडीने शेतीकामासाठी जाताना भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आहेत.घरासमोरील अंगणात खेळताना बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोलापूर येथे घडली. सुप्रित खानाई असे या बालकाचे नाव आहे. तो टाकीत पडल्याचे कोणालाही माहीत नव्हते. तो उशिरापर्यंत परिसरात आढळला नसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत तरंगताना आढळून आला. (प्रतिनिधी)
चिकोडी, संकेश्वर येथे विविध अपघातांत चार ठार
By admin | Updated: July 31, 2014 00:46 IST