शेंडा पार्कातील स्वाधारनगरातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्याच्या संर्पकात आलेल्यांची कोरोना आरटीपीसी चाचणी घेण्यात आली त्यात ते पाचजणांचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे या वसाहतीतील आणखी ६० जणांचे स्वॅब आरोग्य यंत्रणेने घेतले आहेत. त्यांच्या अहवालानंतर दुर्दैवाने यातील काहीजण कोरोनाबाधित झाले, तर त्यांच्यावर उपचार कुठे करायचे असा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण शनिवारी यातील पाचजणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारांसाठी बेड उपलब्ध होईनात. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. त्यांच्या मदतीला व्हिजन ट्रस्टचे संताजी घोरपडे धावून आले. त्यांनी सायबर येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून दिले. वसाहतीलगत मुबलक जागा आहे. त्यामुळे येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी वाढत आहे. माजी नगरसेवक भूपाल शेटे, माया रणनवरे, प्रसाद शेटे, आदी यासाठी प्रयत्नशील आहेत. येथे राहणाऱ्या बांधवांना लसीचा पहिला डोसही उपलब्ध झालेला नाही. त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे; मात्र अद्यापही संबंधित यंत्रणेने लक्ष दिलेले नाही. अंध, अपंग असल्याने येथील बांधवांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचणी आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन जागेवर येऊन लसीकरण करावे. अशी मागणी होत आहे.
चौकट
कुष्ठपीडित बरे झालेल्या बांधवांची संख्या - ३७५
त्यांच्या कुटुंबातील सदस्य संख्या - २५
एकूण घरे -११५
आतापर्यंत स्वॅब घेतलेल्यांची संख्या : ६५
त्यातील पाॅझिटिव्ह रुग्ण - ५
कोट
दुर्लक्षित असणाऱ्या या समाज बांधवांकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष द्यावे. जागेवर येऊन लसीकरण करावे. येथे मुबलक जागा असल्यामुळे स्वतंत्र कोविड सेंटरची स्थापना करावी.
- भूपाल शेटे, माजी नगरसेवक