शिरोली : नागाव फाटा (ता. हातकणंगले) येथील बडोदा बॅँकेचे ‘एटीएम’ मशीन पळविणाऱ्या चौघाजणांच्या टोळीचा शिरोली पोलिसांनी २४ तासांत छडा लावला. टेम्पोमालक व मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील (वय २७), चालक नितीन कांबळे (२८, दोघेही रा. शिवाजीनगर, पेठवडगाव), दीपक कांबळे (३२, रा. समाजमंदिराशेजारी मिणचे), शिवाजी पाटील (रा. लाटवडे) यांना अटक केली.या टोळीचा मुख्य सूत्रधार स्वप्निल पाटील असून, तो स्वत:च्या ४०७ टेम्पो (एमएच ०९, सीए ५०१८) मधून दीपक कांबळे, नितीन कांबळे व शिवाजी पाटील यांना घेऊन महामार्गावरील नागाव फाटा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास आला. बॅँक आॅफ बडोदाचे एटीएम सेंटर खवरे कॉम्प्लेक्समध्ये आहे. या परिसराची पाहणी त्यांनी यापूर्वीच केली होती. त्यांनी प्रथम गॅस कटरने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न अयशस्वी होताच एटीएम मशीन बाहेर काढून सेवामार्गावरील टेम्पोत नेण्यास सुरुवात केली होती; पण चौघांना ते मशीन चढतच नव्हते. इतक्यात शिरोली पोलिसांचे गस्तीपथक तिथे आले. पोलीस नाईक सुहास पाटील, सहायक फौजदार प्रकाश पाटील, गृहरक्षक बाहुबली सांगावे, बाबा चौगुले, संजय नामे यांची चोरट्यांशी झटापट झाली. नितीन कांबळे याने टेम्पो चालू केला व दीपक कांबळे, स्वप्निल पाटील आणि शिवाजी पाटील यांनी पळ काढून टेम्पो पकडला. टेम्पोतून ते एमआयडीसी पहिला फाटा, आंबेडकरनगर मार्गे शिये फाटा येथे आले. तेथून त्यांनी निगवे दुमाला, केर्लीमार्गे वाघबीळ, कोडोलीमार्गे रविवारी जयसिंगपूर गाठले. तेथेच हा टेम्पो लावला. तेथून वडगावला आले आणि आपापल्या घरी गेले. दरम्यान, झटापटीत फौजदार प्रकाश पाटील, सुहास पाटील यांनी टेम्पोचे वर्णन व टेम्पो नंबर घेतला होता. पांढऱ्या रंगाचा, बिनहुडाचा टेम्पो क्रमांक एमएच ०९ सीए ५०१८ एवढ्या माहितीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंबरवरून टेम्पोमालक व त्यांचे पत्ते घेऊन शोधाशोध सुरू केल्यानंतर हा टेम्पो जयसिंगपूर येथे सापडला. तो वडगावच्या स्वप्निल पाटील याच्या नावावर असल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने उरलेल्या तिघांची नावे सांगिंतली व नितीन कांबळे, दीपक कांबळे आणि शिवाजी पाटील यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. (वार्ताहर)‘एचडीएफसी’चे एटीएम फोडल्याचीही कबुली चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता २५ आॅगस्ट २०१४ रोजी शिरोली एमआयडीसीमधील श्रीराम फौंड्रीजवळील ‘एचडीएफसी’ बॅँकेचे एटीएमही फोडल्याची त्यांनी कबुली दिली आहे. तसेच गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित वसाहत येथील दोन एटीएमही फोडल्याचे त्यांनी सांगितले.
‘एटीएम’ पळविणाऱ्या चौघांना अटक
By admin | Updated: September 3, 2014 00:23 IST