कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या दुकान गाळे भाडे आकारणीच्या प्रक्रियेला गती आली आहे. भाडे आकारणीचे सूत्र ठरवण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. मार्गदर्शन मिळताच आठवडाभरात भाडे आकारणीचे सूत्र निश्चित करण्यात येणार आहे. यासंंबंधी महापालिकेत मंगळवारी किंवा बुधवारी महापालिकेत बैठक होणार आहे.
शहरातील महापालिकेच्या गाळे भाड्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी भाडेपोटीची कोट्यवधीची रक्कम देय राहिली आहे. महापालिका प्रशासनातर्फे आकारलेले भाडे वाढ गाळेधारकांना मान्य नाही. याउलट २७ मे २०१९ च्या शासन आदेशानुसार रेडीरेकनर आणि नगररचना प्रशासनच्या सूत्रानुसार गाळे भाडेवाढ करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली. यामुळे भाडेवाढीचा तिढा निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ॲन्ड इंडस्ट्री ॲन्ड ट्रेड (कॅमीट) पुढाकार घेतला आहे. यांनी भाडे आकारणीचे सूत्र तयार करून महापालिका प्रशासनाकडे नुकतेच दिले आहे. कायद्याच्या चाकोरीतून महापालिका प्रशासन याचा अभ्यास करीत आहे. रेडीरेकनरनुसार पण गाळेधारकांनाही सुसह्य होईल, अशी भाडे आकारणी होण्यासाठी महापालिका प्रशासनाने यावेळी प्रयत्न करीत आहे. जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांचे मत आल्यानंतर महापालिकेत संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीत सूत्र ठरल्यानंतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीची बैठक होणार आहे.
बैठकीत भाडेवाढीस मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक गाळेधारकांना भाडे भरण्यासंबंधीच्या नोटिसा काढण्यात येणार आहे. भाडेकरूंना विश्वासात घेत भाडे आकारणीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक आहे. कॅमीटचे पदाधिकारीही पालकमंत्री सतेज पाटील, शहराचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. परिणामी हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कोट
महापालिकेची दुकान गाळे निश्चित करण्याचे सूत्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
घेतले जात आहे. कॅमीटने दिलेला अहवाल आणाि सरकारच्या नियमांची सांगड घालत येत्या आठवडाभरात भाडे आकारणीचे सूत्र निश्चित होईल. त्यानंतर भाडे वसुलीच्या नोटिसा दिल्या जातील.
रविकांत अडसूळ, उपायुक्त, महापालिका