कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाकडून विनामास्क फिरणाऱ्या ९८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ४९ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर महापालिकेत विनामास्क काम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनाही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी दंड केला.
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत मास्क न वापरणे, मास्क अर्धवट घालणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दंडाची कारवाई करून १,६०० रुपये दंड वसूल केला. पवडी अकौंट विभागात व नगरसचिव विभागात कर्मचारी विनामस्क व अर्धवट मास्क घालून वावरत असल्याचे बलकवडे यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी त्यांनी तत्काळ आरोग्य निरीक्षकांना कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कारवाई झालेल्यामध्ये नगरसचिव कार्यालयातील प्रवीण लाड, भगवान चौगुले तर पवडी अकौंटमधील चंद्रकांत पाटील, जितेंद्र माने, तानाजी बोंगाळे यांचा समावेश आहे.