कोल्हापूर : यादवनगरात घराच्या जागेच्या वादातून लोखंडी बार, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून चौघांना जखमी केल्याप्रकरणी राजारामपूरी पोलिसांनी सोमवारी पाचजणांना अटक केली. शनिवारी भाऊबंदकीत हा वाद उफाळला होता. त्यांना आज, मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्यांची नावे अशी, हासिन यासीन मुजावर (वय ४६), सोहेल ऊर्फ इप्पू सलीम मुजावर (२२), आसिफ कासीम मुजावर (२२), तौसिफ हासीम मुजावर (२१, सर्व रा. यादवनगर), सोनिर शकिल खतीफ (२८, रा. यादवनगर, मूळ रा. बाळासाहेब पाटील नगर, कबनूर, ता. हातकणंगले).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमजान मुजावर व यासीन मुजावर हे भाऊबंद शेजारी राहतात. शनिवारी घराच्या जागेच्या कारणांवरून त्यांच्यात वाद उफाळला. यामध्ये यासीन मुजावरसह नऊजणांनी रशिदा मुजावर, पती रमजान मुजावर यांंच्यासह त्यांचे भाचे गफूर शेख, नणंद रेहाना राजू शेख (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर लोखंडी बार, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी नऊजणांवर गुन्हा नोंद झाला होता. त्यापैकी राजारामपुरी पोलिसांत नऊजणांवर गुन्हा नोंद झाला असून, त्यापैकी पाचजणांना अटक केली.