कोल्हापूर : दुर्मीळ, विविध स्वरूपांतील वनस्पतींच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे देशातील पहिले लीड बोटॅनिकल गार्डन (जैवविविधता पार्क) शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाकडून साकारण्यात आले आहे. हे गार्डन शुक्रवार (दि. १५) पासून खुले केले जाणार आहे. त्याचे व नीलांबरी सभागृहाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. परमजित सिंग, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.वनस्पतीशास्त्र विभागात साकारलेल्या वनस्पती उद्यानाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ‘देशातील पहिले लीड बॉटनिकल गार्डन’ म्हणून सन २००७ मध्ये घोषित केले आहे. या गार्डनच्या माध्यमातून पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पती, प्रजातींचे संवर्धन आणि या वनस्पतींचे नवीन उपयोगांबाबतचे संशोधन केले जाणार आहे.विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींबाबत शिक्षण तसेच वनस्पतींच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये प्रबोधन केले जाईल. गार्डनमध्ये सपुष्प, नेचेवर्गीय, पाम, आदी स्वरूपातील सुमारे दीड हजार वनस्पती आहेत. विविध वनस्पतींच्या संशोधनासाठी हे गार्डन संशोधक व अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन बनविणार : यादवटप्प्या-टप्प्याने आणि विविध घटकांच्या सहकार्यातून हे गार्डन साकारल्याची माहिती वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. आर. यादव यांनी दिली. ते म्हणाले, विद्यापीठात सन १९६४ मध्ये वनस्पतीशास्त्र विभागाची स्थापना झाली. यावेळी विद्यापीठाने विभागापासून अर्धा किलोमीटरवर असलेली सहा एकर जमीन बोटॅनिकल गार्डन साकारण्यासाठी दिली. मात्र, ती विभागापासून दूर असल्याने सन १९८५ मध्ये मी विभागप्रमुख झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला विनंती करून विभागाजवळील सहा एकर जागा मिळविली. त्यानंतर हे गार्डन साकारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला सन १९९६ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने साडेआठ लाखांचे अनुदान दिले. यानंतर २००७ मध्ये पर्यावरण मंत्रालयाच्या दिल्लीतील तज्ज्ञांनी गार्डनला भेट देऊन ते ‘देशातील पहिली लीड बॉटनिकल गार्डन’ म्हणून घोषित केले शिवाय ५० लाखांचे अनुदान दिले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील एक कोटींचे अनुदान २०१२ मध्ये मिळाले. विद्यापीठानेदेखील या गार्डनच्या विकासासाठी निधी दिला. हे गार्डन आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने प्रयत्न करणार आहे.
शिवाजी विद्यापीठात देशातील पहिले ‘लीड बोटॅनिकल गार्डन’
By admin | Updated: January 13, 2016 01:24 IST