रवींद्र हिडदुगी -- नेसरी शिकविणाऱ्या शिक्षकाला जसं स्वातंत्र्य हवं असतं, तसं ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही हवं आहे’, हे प्रमुख तत्त्व ज्ञानरचनावादामध्ये मान्य करण्यात आले आहे. केवळ घोकंपट्टी किंवा ‘मी सांगतो ते तुम्ही ऐकायचे’ ही शिक्षककेंद्रित प्रचलित शिक्षण व्यवस्था ‘वर्तनवादी’ म्हणून ओळखली जाते. हीच बंदिस्त चौकट मोडून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अंगांचा विचार करणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती पुढे येत आहे.हेळेवाडी (ता. गडहिंग्लज) या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका शशिकला पाटील यांनी ज्ञानरचनावादाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व कृतियुक्त अध्ययन अध्यापनासाठी मनोरंजनात्मक शैक्षणिक साहित्य विकसित केले आहे. यासाठी त्यांनी काही प्रयोगशील शाळांना भेटी दिल्या आहेत. तसेच शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून, मते अजमावून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली रचनावादी शाळा बनविण्याचा मान पटकाविला आहे.शिक्षक, अधिकारी, शिक्षणप्रेमी आणि न्यायाधीश यांनी ही शाळा पाहून या शाळेचे कौतुक केले. ही शाळा रचनावाद शिक्षणाची मॉडेल शाळा म्हणून उदयास येत असून ही चळवळ जिल्हाभर नेटाने पुढे जात आहे. या प्रयोगाची राज्य शासनानेही दखल घेतली असून, रविवारी (दि. २२) राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शाळेला भेट देणार आहेत.महाराष्ट्रात १ एप्रिल २०१० पासून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी सुरू आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचे व दर्जेदार शिक्षणाचे वचन मिळाले आहे. २००५ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शिक्षण ही पोस्टामार्फत किंवा शिक्षकामार्फत वितरित करायची भौतिक गोष्ट नसून, एक चैतन्यदायी प्रक्रिया मानली गेली. त्यातून स्वयंअध्ययन व कृतिशिलता या पायाभूत ज्ञानरचनावादी अध्ययन, अध्यापन पद्धतीचा अंगीकार झाला.राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या धर्तीवर राज्य अभ्यासक्रम आराखडा (२०१०) तयार झाला आहे. त्यातही ज्ञानरचनावाद अधोरेखित केला आहे. २०१३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात रचनावादाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकेही रचनावादी पद्धतीने तयार करण्यात आली.असा आहे ज्ञानरचनावाद ज्ञानरचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. मुल कसे शिकते? या जुन्याच प्रश्नाचे अर्थपूर्ण असे नवे उत्तर देण्याचा प्रयत्न ज्ञानरचनावादाने केला आहे. नवे ज्ञान हे पूर्वज्ञानाला जोडून येत असते. हे रचनावादाचे प्रमुख सूत्र आहे. यामध्ये शिक्षकांंची भूमिका, मार्गदर्शन व उत्तम सुलभकाची आहे. प्रत्येक मूल स्वतंत्र असते व प्रत्येक मूल शिकू शकते यावर विश्वास असणारी ज्ञानरचनावादी चळवळ गतीने पुढे गेल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, हे हेळेवाडीसारख्या अगदी छोट्या खेड्यातील शाळेने दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्याला आणणारा ज्ञानरचनावाद सर्व शाळांनी अनुसरल्यास महाराष्ट्र राज्य देशात ज्ञानरचनावादी मॉडेल म्हणून उदयास येईल. मात्र, यासाठी सर्व अधिकारी व शिक्षकांनी जबरदस्त इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वास अंगी बाळगून कामाला लागणे विद्यार्थ्यांच्या पर्यायाने देशाच्या हिताचे ठरेल.
हेळेवाडीत जिल्ह्यातील पहिली ज्ञानरचनावादी शाळा
By admin | Updated: November 21, 2015 00:19 IST