संतोष मिठारी - कोल्हापूर -नवीन कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देणे, फटाके वाजविणे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना भेट असा एकंदरीतपणे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. मात्र, मंगळवार पेठ परिसरातील साठमारी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमातील कार्यकर्त्यांनी त्याला बगल दिली आहे. या दिवशी आपल्या परिसरातील दारोदारी फिरून करंज्या, चकली, चिवडा असा मिळेल तो फराळ जमा करून भिकारी, निराधारांना त्याचा घास भरविण्याचा उपक्रम ते गेली ९७ वर्षे राबवीत आहेत.मंगळवार पेठेतील मुक्तांबिका मंदिरात दादा गजबर यांनी १९१७ मध्ये श्री स्वामी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. त्यांनी दरिद्र्यनारायण सेवेंतर्गत कोल्हापुरातील भिकारी, अनाथ आणि निराधारांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यात ते संबंधितांना कपडे आणि फराळ वाटप करीत होते. त्यांची ही परंपरा साठमारी गल्लीतील आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी नवीन कपडे परिधान करून तीन ते चारजणांचे गट करून कार्यकर्ते मंगळवार पेठेतील प्रत्येक घरात जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या असे जे काही नागरिक देतील ते जमा करतात. त्यानंतर यादिवशीच आश्रमात भिकारी, अनाथ आणि निराधारांना या फराळाचे वाटप करतात. यासाठी कोल्हापुरातील विविध परिसरातील भिकारी, निराधार याठिकाणी स्वत:हून येतात.समाधान लाभते...भिकारी आणि निराधारांसाठी आम्ही राबवीत असलेल्या उपक्रमांना नागरिकदेखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही एकत्रित केलेल्या फराळाचे दोनशे ते अडीचशे जणांना वाटप करतो. फराळासाठी दारोदारी फिरताना कोणताही कमीपणा आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत या निराधारांना फराळाचे वाटप करीत नाही. तोपर्यंत आश्रमातील एकही कार्यकर्ता फराळ करीत नाही. - संजय पायमल (सदस्य, श्री स्वामी विवेकानंद आश्रम)
निराधारांसाठी फराळाचा पहिला घास
By admin | Updated: October 23, 2014 00:01 IST