यड्राव : येथील पार्वती औद्योगिक वसाहतमधील एन.आर. इंटरप्राईजेस या कपडे निर्मिती उद्योगाला सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये सुशील मानधना यांच्या मालकीचा एन. आर. इंटरप्राईजेस (मानधना) या नावाचा कारखाना आहे. या ठिकाणी कपडे व बेडशीट निर्मिती करण्यात येते. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने हा कारखाना बंद आहे.
कंपनीचे चालक सकाळी साडेनऊ वाजता कंपनीमध्ये गेले असता त्याना मुख्य कार्यालयातून धूर व आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती मालकांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर नगरपालिका व संजय घोडावत ग्रुप या दोन अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. या आगीत कार्यालयातील संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, सिलिंग व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
फोटो ओळी : यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील एन. आर .एंटरप्राइजेस या उद्योगाच्या कार्यालयाचे आगीमुळे नुकसान झाले.