हनमंतवाडी (ता. शाहूवाडी) येथे गवत व पिंजरांच्या गंज्यांना आग लागून १ लाख ५२ हजारांचे नुकसान झाले असून, पावसाळ्यासाठी जनावरांच्या चाऱ्याची बेगमी करून ठेवलेला संपूर्ण चारा जळाल्याने येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही. उदय कारखान्याचे संचालक रणवीर गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
हनमंतवाडी येथे आज दुपारी एकच्यादरम्यान गावाच्या दक्षिणेकडील बाजूस वाडीतील शेतकऱ्यांचा एकत्र जनावरांचा चारा रचून ठेवलेला होता. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये कोणत्याहीप्रकारची जीवितहानी झाली नाही.
या आगीमध्ये बापू साधू सावेकर, दगडू बापू पंदारे, सखूबाई यशवंत भाकरे, वंदना बाजीराव भाकरे, ज्ञानू विठू सावेकर, संजय हरी सावंत, आक्काताई विश्वास दाते, रखमाबाई बंडू दाते, रंगराव नामू चिले, आशा तानाजी सावेकर, भीमराव रामचंद्र सावेकर या शेतकऱ्यांचा वाळलेला संपूर्ण चारा जळून खाक झाला.