नेसरीसह पंचक्रोशीतील ५८ महिला बचत गटांना येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून एक कोटी दहा लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. महिला बचत गट दिवसाचे औचित्य साधून या सर्व ५८ बचत गटांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती शाखाधिकारी दिगंबर लाळगे यांनी यावेळी दिली.
जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया शाखा नेसरी व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बँक ऑफ इंडिया शाखेत बचत गटांना अर्थसाहाय्य प्रमाणपत्रे शाखाधिकारी लाळगे, अजय कुमार, लोकमतचे बातमीदार रवींद्र हिडदुगी, प्रभाग समन्वयक महादेव गुरव यांच्या हस्ते देण्यात आली.
शाखाधिकारी लाळगे म्हणाले, बचत गटातील महिला या घेतलेले कर्ज नियमित भरत असल्याचा विश्वास निर्माण झाल्याने बँक ऑफ इंडिया त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी आहे. मिळालेल्या कर्ज रकमेचा उपयोग विविध लघु उद्योग, जनावरे खरेदी करून दुग्ध व्यवसाय आदी तत्सम व्यवसाय वाढीसाठी करून आपली उन्नती करावी. महादेव गुरव म्हणाले, महिलांना आत्मनिर्भर बनविणे, त्याचबरोबर साक्षर व सक्षम करणे हे राज्य व केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा सुरळीत व वेळेत कर्ज भरून व्याज परतावा मिळवा, असे आवाहन केले.
यावेळी बँक सखी कमल मुंगुरकर, धन्वंतरी देसाई, सुषमा पाटील, महादेव वाईगडे व नेसरी गणातील बचत गट सहायक दयानंद गगली, दयानंद येमेटकर, शंकर नांदवडेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. आभार अंजुम नूलकर यांनी मानले.
....
फोटो ओळी
नेसरीतील नैतिक महिला बचत गटाला अर्थसाहाय्य प्रमाणपत्र वितरित करताना बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी दिगंबर लाळगे, यावेळी रवींद्र हिडदुगी, महादेव गुरव, कमल मुंगुरकर, अंजुम नूलकर आदी.