कोल्हापूर : एकही रुग्ण दाखल नसलेले शिंगणापूर येथील कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. या सेंटरला बुधवारी भेट दिल्यानंतर एक तास एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. याबाबत ‘लोकमत’ने वस्तुस्थिती प्रकाशित केल्यानंतर तातडीने शनिवारी हे सेंटरच बंद करण्यात आले.
गेल्यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतनमध्ये हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. गेल्या दीड वर्षात रुग्णांना याचा फायदाही झाला. परंतु सध्या त्या ठिकाणी रुग्ण नसताना हे सेंटर सुरूच ठेवण्यात आले होते. या ठिकाणी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियु्क्ती करण्यात आली होती. त्या ठिकाणी एक तास थांबल्यानंतरही एकही कर्मचारी तिथे आला नाही. इंजेक्शन्स, औषधे, रजिस्टर्स सर्व साहित्य या ठिकाणी उघड्यावर होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. अखेर हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व साहित्य आत ठेवून सेंटरला कुलूप घालण्यात आले आहे.
कोट
ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत ती कोविड सेंटर बंद करण्याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते. तरीही शिंगणापूर येथील सेंटर सुरूच होते. ते बंद करण्यात आले असून, त्या ठिकाणी बुधवारी कोणीच उपस्थित नव्हते. याबाबतचा लेखी अहवाल तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागवला आहे.
डॉ. योगेश साळे,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद कोल्हापूर