कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची आज, गुरुवारी मुंबईत बैठक झाली. अहवालाचा अभ्यास समितीने सुरू केला असून, येत्या चार दिवसांत राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सचिव बी. के. माळी यांनी ‘लोकमत’ला दिली.‘आयआरबी’ने केलेल्या ४९.९९ कि.मी. रस्त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या प्रोफेसर श्री कृष्णा राव यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समितीने अहवालातील सूचविलेल्या त्रृटी दूर केल्याची आज खात्री केली. अहवालाचा सूक्ष्म अभ्यास करून नेमक ी रस्त्याची किंमत व शिल्लक कामांचा तपशील, करार व प्रत्यक्ष काम याबाबत सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. गेल्या महिन्यात तीन आवड्यांत मंडळाने चार अभियंत्यांच्या पथकाद्वारे रस्त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘रोड लेव्हल व बिटल्स सर्व्हे’ (सर्वंकष सर्वेक्षण) केला. यापूर्वी राव समितीने रस्त्यांची दोन वेळा पाहणी केली आहे. यानंतर मंडळाने केलेल्या मूल्यांकन अहवालाचे पडताळणी राव समिती करीत आहे. यासाठीच समितीने आजच्या बैठकीत सर्व अहवालाचा तपशीलवार आढावा घेतला. मागील बैठकीत समितीने सूचविलेल्या त्रृटी कमी झाल्याची तपासणी आजच्या बैठकीत करण्यात आली. गरज पडल्यास समितीची पुन्हा बैठक घेतली होणार आहे. राज्य शासनाला समितीने मूल्यांकन अहवाल दिल्यानंतर प्रकल्पाचे पैसे भागविणे व टोल रद्दबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मूल्यांकन समितीच्या अहवालाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात
By admin | Updated: August 14, 2014 22:38 IST