कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषण विरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचगंगा प्रदूषणप्रश्नी सुरू असलेले हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील व विश्वास बालीघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गत महिन्यात पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने त्याची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी बांधून घातले होते. त्यामुळे अधिकारी हरबड यांनी बंडू पाटील, बालीघाटे यांच्यासह इतर तीन अज्ञात कार्यकर्त्यांवर कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या सर्वांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते.
ते म्हणाले, पंचगंगा प्रदूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले, तरी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखाने व उद्योग, व्यावसायिक यांच्यावर गून्हे दाखल का झाले नाहीत? उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड हे सतत रजेवर का असतात? शिवाय अधिकारी रवींद्र आंधळे कार्यालयात व प्रदूषण ठिकाणी न येण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करून अधिकारी नदी प्रदूषित करणारे कारखानदार व प्रोसेसधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, नदी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकावे, अशा सूचना देऊनदेखील त्याची अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी बंडू उंमडाळे, रघू नाईक, अमीर नदाफ यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.