राम मगदूम -- गडहिंग्लज --अकरावी प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज व मागणी असतानाही केवळ प्रयोगशाळेची कमतरता व शिक्षकांचा पगार परवडत नाही म्हणून येथील एम. आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विज्ञान शाखेची दुसरी तुकडी यंदापासून बंद करण्याचा घाट जिल्हा परिषदेने घातला आहे. याप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे गोरगरीब मुलांनी शिकायचे कुठे? असा सवाल शिक्षणप्रेमी जनतेतून विचारला जात आहे.१९२३ मध्ये करवीर संस्थान काळात सुरू झालेली ही शाळा स्वातंत्र्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे चालविली जाते. १९७४ पासून या ठिकाणी अकरावी विज्ञान शाखा सुरू झाली. ‘विज्ञान’च्या पूर्वीच्या दोन्ही तुकड्या अनुदानित असून, बारावीचा निकाल नेहमी १०० टक्के लागतो. त्यामुळे गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, कागल व भुदरगड या तालुक्यांतील विद्यार्थीदेखील येथे शिक्षणासाठी आवर्जून येतात. २०१३-१४ पासून विज्ञान शाखेची पहिली विनाअनुदानित, तर २०१५-१६ पासून दुसरी तुकडी सुरू करून गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला.तथापि, शिक्षकांना नियमाप्रमाणे द्यावा लागणारा पगार आणि प्रयोगशाळा पुरेशी नसल्याच्या कारणावरून यंदापासून विनाअनुदानित दुसरी तुकडी बंद करण्याचा घाट जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने घातल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतदेखील या विषयावर खडाजंगी झाली. मात्र, त्यावेळी ‘गडहिंग्लज’ विभागातील एकाही सदस्याने त्यावर ‘ब्र्र’ देखील काढले नाही. त्यामुळे खासगी शाळांना चालना देण्यासाठीच ‘एमआर’ची तुकडी बंद करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकाराबद्दल शिक्षणप्रेमींसह पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काही पक्ष, संघटना आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत.२०१५-१६ मध्ये विद्यार्थी व पालकांची मागणी आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर विनाअनुदानित दुसरी तुकडी सुरू करण्यात आली. या तुकडीच्या मान्यतेचा प्रस्तावही पाठविण्यात आला. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे यावर्षी विनाअनुदानित दुसऱ्या तुकडीत प्रवेश देता येणार नाही.- डॉ. गणपतराव कमळकर, गटशिक्षणाधिकारी तथा प्र. प्राचार्य, एम. आर. प्रशाला, गडहिंग्लज.
‘एम.आर.’ची तुकडी ‘बंद’ करण्याचा घाट
By admin | Updated: June 30, 2016 23:55 IST