लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दि फेडरल बँकेने ‘सीएसआर’ फंडातून कोविड लसीचे दोन हजार डोस मोफत देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून, हे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोल्हापुरात फेडरल बँकेच्या फेडरल स्किल अकॅडमीमध्ये मोफत लसीकरण कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेच्या कर्मचारी कल्याण निधीमधून कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या मोफत कोविशिल्ड लसीकरणाचा प्रारंभही करण्यात आला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, दि फेडरल बँकेने सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून २०१९ च्या महापुरातील पडझड झालेल्या घरे व शाळांची उभारणी केली. तसेच फेडरल स्किल अकॅडमीच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योगधंद्याचे प्रशिक्षण देण्यातही मोठा वाटा उचललेला आहे.
फेडरल बँकेचे विभागीय प्रमुख अजित देशपांडे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे बँकेच्या वाटचालीत नेहमीच सहकार्य मिळते. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, आर. के. पोवार, असिफ फरास, विलास गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, उदयानी साळुंखे, निशा थोरात, मोहन कुंभार, अजित कुलकर्णी, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन व्यवस्थापक जी. एम. शिंदे उपस्थित होते.
फोटो ओळी : दि फेडरल बँकेच्या वतीने सीएसआर फंडातून मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, अजित देशपांडे, डॉ. अजित पाटोळे, आदी उपस्थित होते. (फोटो-३१०७२०२१-कोल-फेडरेल बँक)