कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील दहा हजार लोकवस्तीच्या असलेल्या गावात गेल्या दोन महिन्यात ९१ कोरोना रुग्ण संख्या झाली आहे. पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून चार संस्थांत्मक व ३५ गृहविलगीकरणात तर उर्वरित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत हे गाव येत असल्याने आरोग्य सेवक बबलू सनदी रुग्णांना औषधोपचारासह इतर सेवा नित्यनेमाने देत असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
गावामध्ये खासगी स्वरूपाचे २० बेडचे कोविड केअर सेंटर आहेत. गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याने अनेकांना नाईलाजास्तव खासगी कोविड सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोना रुग्णांमध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनची पातळी कमी असते. खासगी रुग्णालयात दाखल करताना रुग्णालयात ऑक्सिजन तपासले जाते. ऑक्सिजनची पातळी ७५ च्या खाली असेल तर कोविड सेंटरला ऑक्सिजनची सुविधा असूनही दाखल करून घेतले जात नाही. शासकीय रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने व पर्याय नसल्याने रुग्णाचा उपचाराविना मृत्यू झाल्याची घटना गावात घडली आहे.
खासगी दवाखान्याबरोबर रुग्णवाहिकांचीही रुग्णांच्या नातेवाईकांकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचा अनुभव येत आहे. शिरढोण ते इचलकरंजी ऑक्सिजनची सोय असलेली ॲम्ब्युलन्स साधारणपणे अठरा ते वीस किलोमीटर प्रवासासाठी तब्बल नऊ हजार रुपये आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना आजारापेक्षा उपचार खर्च भयंकर झाल्याने रुग्ण व नातेवाईकांना आजारापेक्षा उपचाराचीच धास्ती जास्त आहे.