चित्रपटासारखी घडली घटना
मुरगूड : हमिदवाडा (ता. कागल) येथे फसवून घरात शिरून सासू व सुनेला चाकूचा धाक दाखवून सुमारे सात तोळ्यांच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. हुबेहूब चित्रपटामधील प्रसंगासारखी घटना घडली आहे. याबाबत पूजा एकनाथ वरूटे यांनी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलीस या चोरट्यांचा कसून तपास करत आहेत. सदरची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी हमिदवाडा (ता. कागल) येथील माळवाडी येथे एकनाथ वरुटे हे आपल्या पत्नी पूजा व आई बेबीताई यांच्याबरोबर राहतात. सोमवारी एकनाथ हे रात्रपाळीला एमआयडीसी येथे कामावर गेले होते. त्यामुळे घरी पूजा आणि त्यांची सासू बेबीताई या दोघीच होत्या. त्या साडेअकराच्या सुमारास टी.व्ही. बघत बसल्या होत्या. त्यावेळी दारातून एकनाथ अशा हाका मारल्या गेल्या. त्यामुळे कोण बोलावत आहे हे पाहण्यासाठी पूजा यांनी दरवाजा उघडला.
त्यावेळी एक अंगाने जाड असणारा एक अज्ञात इसम घरामध्ये शिरला. त्याच्या हातामध्ये चाकू होता. त्याने त्या दोघींनाही चाकूचा धाक दाखवून दागिने काढून देण्यास सांगितले. त्याला सासू बेबीताईनी विरोध केला. त्यांनी सुनेला ही दागिने देऊ नकोस, असे सांगितले. यावेळी त्या चोरट्याने बेबीताई यांच्या अंगावर झेप घेत त्यांच्या गळ्याला चाकू लावला या झटापटीत त्यांच्या हाताला जखमही झाली. त्यामुळे घाबरून पूजाने अडीच तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचा नेकलेस व एक तोळ्यांची कानातील फुले असे सुमारे सात तोळ्यांचे सुमारे साडेतीन लाखाचे दागिने त्या चोरट्याकडे दिले.
त्यानंतर जर तुम्ही आरडाओरडा केलात तर बाहेर माझे सात ते आठ साथीदार उभे आहेत, ते तुम्हाला ठार मारतील शिवाय कामावरून येताना एकनाथला ही आम्ही जीवे मारू, अशी धमकी देऊन चोरट्याने धूम ठोकली. जाताना त्याने बाहेरच्या दोन्ही दरवाज्यांना कड्या घातल्या. थोड्या वेळाने घाबरलेल्या सासू बेबीताई व पूजा यांनी मागच्या दाराने बाहेर जाऊन आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमले. अनेकांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. मुरगूड पोलिसांनी श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले पण ते ही घराच्या अवतीभोवती घुटमळले. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळपासून काही इसम संशयास्पद घराच्या अवतीभोवती फिरत होते, असे पूजा यांनी पोलिसांना सांगितले.