कोल्हापूर : भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. मोदी सरकारने या अर्थसंकल्पात गुंतवणुकीस वाव दिल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे यांनी आज, गुरुवारी येथे व्यक्त केला. कॉन्फिडरेशियन इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय)च्या पश्चिम महाराष्ट्र शाखेतर्फे हॉटेल पॅव्हेलियन येथे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ककडे म्हणाले, गेल्या सरकारच्या काळातच परदेशी गुुंतवणुकीबाबत चर्चा सुरू होती, परंतु गोंधळाच्या वातावरणाबरोबरच संशयाचे धुके निर्माण झाल्याने त्याला विरोध झाला होता. या सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे धुके दूर केले आहे. या अर्थसंकल्पात शेतीसारख्या क्षेत्राकडे कमी लक्ष दिल्याचे दिसून आले. शेती विकासाला प्राधान्य देणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना इतर क्षेत्रांप्रमाणे सुरक्षेसाठी शंभर टक्के विमा देण्याची आवश्यकता आहे. देशात सध्या ३० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. ही संख्या येत्या पाच वर्षांत शून्यापर्यंत आणण्याचे आव्हान सरकारला आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल खरोखरंच तपासण्याची गरज आहे.‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, औद्योगिक क्षेत्र, पर्यटन व पायाभूत सुविधांसह कौशल्य विकास ही क्षेत्र येणाऱ्या काळात ‘ग्रोथ’मध्ये येणार आहेत. व्हिजन स्पष्ट असणारे व भारताला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई-बंगलोर कॉरिडॉरबाबत या अर्थसंकल्पात चर्चा झाली आहे. त्यामध्ये या मार्गावरील २० इंडस्ट्रीयल पार्क विकसित केले जाणार आहेत.कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने म्हणाले, नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी देशाची औद्योगिक प्रगती थांबली आहे तिला चालना द्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यानुसार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुरुवात तरी चांगली झाली आहे. त्याची फलनिष्पत्ती पाहण्यासाठी किमान एक वर्षाची तरी वाट पाहावी लागेल.‘गोशिमा’चे अध्यक्ष उदय दुधाणे म्हणाले, ५० हजार कोटींहून अधिक रुपये रस्ते व पायाभूत सुविधांसाठी खर्च केले जाणार आहेत, असे या अर्थसंकल्पातून सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला नक्कीच चालना मिळणार आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर म्हणाले, हा अर्थसंकल्प योग्य दिशेने व सर्वसामान्यांचा विचार करून केलेला आहे. ‘सीआयआय’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन शिरगांवकर म्हणाले, रस्ते, नद्याजोड प्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशातील उद्योगांना चालना मिळेल. गुडस् अॅन्ड सर्व्हिस टॅक्स वर्षाअखेरपर्यंत अंमलात आणला जाणार आहे. त्याचा उद्योगांना चांगला फायदा होणार आहे.उद्योजक रामप्रताप झंवर म्हणाले, काही प्रमाणात उद्योगांना चालना मिळणार आहे. इन्फ्रा स्ट्रक्चरमुळे उद्योग वाढेल. पण टॅक्सेसबाबतीत मोठे निर्णय झालेले नाहीत. यावेळी श्रीकांत दुधाणे, अतुल पाटील, मोहन कुशिरे, संजय जोशी, सुजितसिंग पवार, शिवराज जगदाळे, शिवाजीराव पोवार, शांताराम सुर्वे, प्रदीप कापडिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
परदेशी गुंतवणुकीमुळे उद्योगांना चालना
By admin | Updated: July 10, 2014 23:32 IST